(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींना चांगला प्रतिसाद म्हणूनच भाजपचा रडीचा डाव, देशात 'रावणराज्या'चा सरकारी वरवंटा फिरवला जातोय, सामनातून टीका
अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो 'रावणराज्या'चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
Saamana Editorial on Bharat Jodo Nyay Yatra : मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) अनेक ठिकाणी भाजपकडून (BJP) विरोध होताना दिसतोय. आसामध्ये (Asam) राहुल गांधींना आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. यावरुन बराच वादही झाला. याच वादावर सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) सरकारचा समाचार घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ने पहिल्या दहा दिवसांतच भाजपच्या तंबूत घबराट निर्माण केली आहे. त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या यात्रेवरील मार्गात आसाममधील भाजप सरकारकडून दररोज काटे पेरण्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला.
सामना अग्रलेखात म्हटलंय की, "अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो 'रावणराज्या'चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला 'रावणराज्य' नाही तर काय म्हणायचे?"
न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच अपशकुन करण्याचे प्रयत्न सुरू : सामना
पुढे म्हटलं आहे की, "राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्याने अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्याने सुरू आहेत. मणिपुरातून आसामात पोहोचल्यापासून रोज कुठे ना कुठे 'न्याय यात्रे'वर हल्ले सुरू आहेत. मात्र, राहुल गांधीही तेवढ्याच हिमतीने आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे न्याय यात्रेतील सभांतून वेशीवर टांगत आहेत. राहुल गांधी यांनी आसामात पाय ठेवल्यापासून भाजपचे कार्यकर्ते न्याय यात्रेच्या काफिल्यासमोर ठिकठिकाणी अडथळे निर्माण करीत आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेने आसामात प्रवेश करण्यापूर्वीच मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची आणि अटक करण्याची धमकी दिली होती. आता तर गुवाहाटीत न्याय यात्रेने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच राहुल गांधींवर 'एफआयआर' दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री सर्मा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत."
मुख्यमंत्री सर्मा यांनी काँग्रेस सोडली आणि 'कमळछाप' साबणाने आंघोळ केली : सामना
"मुख्यमंत्री सर्मा मूळ काँग्रेसचेच, पण आपल्याकडच्या मिंध्यांप्रमाणे तिकडे सीबीआयने शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी धाडी घालून गुन्हे दाखल करताच त्यांनी काँग्रेस सोडली आणि 'कमळछाप' साबणाने आंघोळ केली. त्यामुळे 'शुद्ध' झालेल्या सर्मा यांना भाजपने थेट इकडच्या मिंध्यांप्रमाणेच आसामचे मुख्यमंत्री केले. बाटगा अधिक जोरात बांग देतो, असे म्हणतात त्याप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. कधी राहुल गांधींची गाडी रोखली जात आहे, कुठे न्याय यात्रेच्या काफिल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो आहे, कुठे राहुल गांधींना जाहीर सभा घेण्यास मज्जाव केला जात आहे, तर कुठे मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. मंदिर प्रशासनाचे निमंत्रण असतानाही पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे राहुल गांधींना रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करावे लागले. या देशात केवळ एकाच व्यक्तीला मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे व तो चुकीचा नाही.", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
राहुल गांधी यांची न्याय यात्रा गुवाहाटीत दाखल होताचस आसाम पोलिसांकडून लाठीहल्ला : सामना
"मंगळवारी तर आसाम सरकारने कहरच केला. राहुल गांधी यांची न्याय यात्रा गुवाहाटी शहरात दाखल होत असतानाच आसाम पोलिसांनी यात्रेतील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीहल्ला केला. केवढी ही मग्रुरी! त्याआधी आसाम-मेघालय सीमेवरील एका खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापासून राहुल गांधी यांना रोखण्यात आले. मात्र राहुल गांधी यांना आसामात एवढा जबरदस्त पाठिंबा मिळत आहे की, राहुल यांना प्रवेश नाकारल्यानंतरही विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर येऊन राहुल गांधी यांना बोलण्याचा आग्रह केला. विद्यापीठाच्या गेटबाहेरच राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुळात शांततामय मार्गाने वाटचाल करणाऱ्या देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या यात्रेत जागोजागी अडथळे आणून रडीचा डाव खेळण्याचे कारणच काय? विरोधी पक्षांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचता कामा नये, या उर्मट वृत्तीतून हे सारे घडवले जात आहे. देशातील जनतेने केवळ मी काय सांगतो तेच ऐकावे, वृत्तपत्रांनीदेखील केवळ मी काय बोलतो तेच छापावे, वृत्तवाहिन्यांनी फक्त मलाच दाखवावे असा हुकूमशाही कारभार देशात सुरू आहे.", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, "अहंकारी राजाची ही अन्यायकारी राजवट 'रामराज्या'च्या कुठल्या संकल्पनेत बसते? 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता काही महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून केल्या जाणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व रावणराज्याचा पर्दाफाश करण्यासाठीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तणावग्रस्त मणिपुरातून सुरू झालेल्या या न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. बस प्रवास आणि पायपीट करत तब्बल 66 दिवस चालणारी ही न्याय यात्रा एकंदर 15 राज्यांतील 100 लोकसभा मतदारसंघ आणि 337 विधानसभा मतदारसंघ पालथे घालत 6 हजार 700 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेला प्रत्येक राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता भाजपने या दुसऱ्या यात्रेचा जबर धसका घेतला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 'राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेमुळे आम्हाला काडीचाही फरक पडणार नाही,' असा दावा भाजपने या यात्रेच्या प्रारंभी केला होता. तथापि, आसामात न्याय यात्रेवर लागोपाठ झालेले हल्ले पाहता भाजपचा हा दावा किती पह्ल आहे, हेच स्पष्ट होते. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' न्याय यात्रेने पहिल्या दहा दिवसांतच भाजपच्या तंबूत घबराट निर्माण केली आहे. त्यामुळेच रडीचा डाव खेळून राहुल गांधी यांच्या यात्रेवरील मार्गात आसाममधील भाजप सरकारकडून दररोज काटे पेरण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळणाऱया प्रचंड प्रतिसादामुळे केंद्र सरकार घाबरले आहे, हेच सत्य आहे व सरकार घाबरले नसेल तर या यात्रेवर हल्ले का सुरू आहेत? स्वतःला महाशक्ती म्हणवणाऱया भ्याड सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर आहे काय?"