परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर गांधीनगरमधून राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार; 24 जुलैला निवडणूक
S. Jaishankar: राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरातमधील तीन जागांचा समावेश आहे.
S. Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) आज गुजरातच्या (Gujarat News) गांधीनगरमधून (Gandhinagar) राज्यसभेच्या उमेदवारीसाठी (Rajya Sabha Nomination) अर्ज दाखल करणार आहेत. गुजरात (Gujarat), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि गोवामधील (Goa) राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरातमधील तीन जागांचा समावेश असून त्यापैकी एका जागेसाठी एस. जयशंकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, त्यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे.
जयशंकर यांच्याशिवाय गुजरातमधील राज्यसभा खासदार दिनेश जेमलभाई अनावडिया आणि लोखंडवाला जुगल सिंह यांचा कार्यकाळही 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. दुसरीकडे, काँग्रेसनं गुजरात राज्यसभा निवडणुकीतून आपलं नाव मागं घेतलं आहे. विधानसभेत त्यांच्याकडे फारशा जागा नसल्यामुळे काँग्रेसनं यावेळी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष मनीष दोशी यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले आकडे मिळाले नाहीत, त्यामुळे यावेळी आगामी राज्यसभा निवडणुकीत पक्ष सहभागी होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
'या' राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका
देशातील तीन राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यात गुजरात, गोवा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 6, गोव्यात 1 आणि गुजरातमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. विनय तेंडुलकर यांचा गोव्यातील कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे. तर डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, सुखेंदू शेखर रे, प्रदीप भट्टाचार्य आणि शांता छेत्री यांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत उतरण्यासाठी उमेदवार 13 जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकतात आणि तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 17 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी कोण करणात मतदान?
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील विधानसभेचे सदस्य मतदान करतात. विधान परिषदेचे सदस्य यामध्ये सहभागी होत नाहीत. तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला 10 सदस्यांची संमती असणं आवश्यक आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा फॉर्म्युला राज्यांशी जोडलेला असतो. ज्या राज्यासाठी निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामध्ये 1 अधिक केलं जातं आणि त्यात राज्यातील विधानसभेच्या एकूण जागांच्या संख्येनं भागली जाते. यानंतर जो आकडा येतो, त्यात पुन्हा 1 जोडला जातो. यानंतर जो आकडा येईल, उमेदवाराला विजयी होण्यासाठी तेवढ्याच मतांची आवश्यकता असते.