RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चिंतन शिबिर, 'या' महत्वाच्या मुद्यांवर होतेय चर्चा
RSS चं एक महत्वाचं चिंतन शिबीर सध्या मध्य प्रदेशात सुरु आहे. यूपी निवडणुका, केंद्रात संघाच्या अजेंड्यावर असलेल्या कायद्यांची आवश्यकता आणि कोरोनाची तिसरी लाट हे प्रमुख मुद्दे या बैठकीत मांडले जातायत.
चित्रकुट : पुढच्या वर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका या भाजपसाठी महत्वाच्या आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार स्थापन होणार की नाही यावरच 2024 च्या दृष्टीनंही संकेत मिळणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संघाचं एक महत्वाचं चिंतन शिबीर सध्या मध्य प्रदेशात सुरु आहे. आगामी यूपी निवडणुका, केंद्रात संघाच्या अजेंड्यावर असलेल्या कायद्यांची आवश्यकता आणि कोरोनाची तिसरी लाट हे प्रमुख मुद्दे या बैठकीत मांडले जातायत. धर्म, संस्कृती आणि सत्ताकारण या तीनही आघाड्यांवर संघाचं हे मंथन सुरु आहे.
पाच दिवसांच्या या बैठकीसाठी 50 ते 55 लोक प्रत्यक्षपणे सहभागी आहेत..अखिल भारतीय प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारकांची ही बैठक आहे...या बैठकीसाठी इतर 250 लोक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमानं जोडले गेलेत...उत्तर प्रदेशची निवडणूक ही 2024 साठीची सेमीफायनल आहे...त्याच निमित्तानं या मंथन शिबीरात रणनीती आखली जातेय.
संघानं आपली प्रतिमा धर्मनिरपेक्ष दाखवण्यासाठी पण प्रयत्न करायला हवेत का..ही प्रतिमा देशात आणि राज्यात भाजपची सत्ता मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे का, जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना ही धर्मनिरपेक्ष प्रतिमा रुचेल का आणि देशात तिसरी लाट आलीच तर ती रोखण्यासाठी संघ कुठल्या पद्धतीची भूमिका बजावू शकतो
उत्तर प्रदेशात योगी सरकार पुन्हा स्थापित करण्यासाठीही संघ दक्ष असल्याचं सांगितलं जातंय..त्यासाठी कशा पद्धतीची रणनीती असावी याबाबतही मंथन केलं जातंय..देशात जनसंख्या नियंत्रण कायद्याची गरज असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात केलं होतं..त्याही बाबत हालचालीची आवश्यकता संघाच्या वर्तुळातून व्यक्त होतेय..शिवाय धर्म परिवर्तनाच्या विरोधात काही भाजप शासित राज्यांनी कायदे केले आहेत..तसाच कायदा केंद्राच्या पातळीवरही करता येईल का याचीही चाचपणी सुरु आहे.
उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांबाबत चर्चा करताना राम मंदिराचा मुद्दा येणं स्वाभाविकच आहे. याच मंदिराच्या जमीन खरेदी व्यवहारावरुन नुकतेच काही आरोप समोर आले होते. त्यात ट्रस्टचे सचिव चंपतराय यांच्या कार्यशैलीवरही अनेकांनी आरोप केले होते...त्याही बाबत संघाकडून गांभीर्यानं विचार सुरु असल्याचं कळतंय...त्यामुळे चित्रकुटमधल्या संघाच्या या मंथनातून आता यूपीसाठी कुठला मंत्र समोर येतोय हे पाहावं लागेल.