गर्भवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार, रात्रभर थंडीत बसली महिला!
गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रात्रभर थंडीत बसलेल्या गर्भवती महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.
बेळगाव : गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रात्रभर थंडीत बसलेल्या गर्भवती महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना काल समोर आली. घोटगाळी गावातील मनीषा दीपक कुंभार ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास आली होती. पण जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ कोविड रुग्णांना घेतले जात असून प्रसूतीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जावा असे सांगण्यात आले.
खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पैसे नसल्याने ती महिला आपल्या नातेवाईकासह जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर रात्री दोन वाजल्यापासून थंडीत बसली होती.रुग्णालयाच्या बाहेर प्रसूतीसाठी आलेली महिला थंडीत कुडकुडत बसल्याची माहिती सकाळी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि गणेश रोकडे यांना समजली.
त्यांनी नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश चौगलअर यांच्याशी संपर्क साधून गर्भवती महिलेची माहिती दिली. त्यावर डॉक्टरांनी त्या महिलेला आपल्या दवाखान्यात दाखल करा तिची प्रसूती मोफत केली जाईल असे सांगितले. नंतर त्या महिलेला रुग्णवाहिकेतून नवजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री त्या महिलेची प्रसूती झाली.
गर्भवती महिलेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणे शक्य नव्हते. त्यामुळे ती महिला आणि तिच्या बरोबर आलेल्या व्यक्तींनी थंडीत कुडकुडत रात्र काढली. सकाळी काही जणांनी त्यांची चौकशी केली असता खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पैसे नसल्याने जिल्हा रुग्णालयाबाहेर बसल्याचे कळले. ही माहिती संतोष दरेकर आणि गणेश रोकडे यांना कळवण्यात आली.त्यांनी लगेच जिल्हा रुग्णालयाकडे रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली. नवजीवन हॉस्पिटल्सही संपर्क साधून तेथे महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूती शुक्रवारी मध्यरात्री झाली. प्रसूतीच्या वेळी काही समस्या उदभवल्या होत्या पण डॉक्टर आणि त्यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून व्यवस्थित प्रसूती पार पाडली. मनीषाने मुलाला जन्म दिल्याचे हॉस्पिटलमध्ये कळताच तेथील अन्य रुग्णांनी आनंद व्यक्त करून डॉक्टरांचे अभिनंदन केले. संतोष आणि गणेश हे देवदूता प्रमाणे मदतीला आले म्हणूनच माझी सुरक्षित प्रसूती झाल्याच्या भावना मनीषा यांनी व्यक्त केल्या.