(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rare Sawfish: कर्नाटकात मच्छिमारांनी पकडला 250 किलोचा दुर्मिळ मासा, क्रेनच्या मदतीने काढला बाहेर
कर्नाटकातील मालपे येथे मच्छिमारांनी दुर्मिळ असा 'सॉ फिश' पकडला आहे. हा मासा पाहून ज्यांनी हा मासा पकडला त्यांनाही आश्चर्य वाटत आहे.
कर्नाटकातील मालपे येथे मच्छिमारांनी दुर्मिळ असा 'सॉ फिश' पकडला आहे. हा मासा पाहून ज्यांनी हा मासा पकडला त्यांनाही आश्चर्य वाटत आहे. मध्य समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या 'सी कॅप्टन' या बोटीवर असलेल्या मच्छिमारांनी हा मासा पकडला आहे. हा 250 किलोचा मासा क्रेनच्या साहाय्याने समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आला. याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. याचाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा मासा 'कारपेंटर शार्क' या नावानेही ओळखला जाते. हा एक लुप्तप्राय प्रजातीचा मासा आहे. याला वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. मंगलोर सिटी नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून या माशाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये तज्ज्ञांचा हवाला देऊन लिहिले आहे की, "कारपेंटर शार्क ही एक लुप्तप्राय प्रजाती आहे. ज्यांची संख्या कमी झाली आहे." तज्ञांच्या मते, गेल्या दशकभरात ही प्रजाती भारतीय किनारपट्टीवर 10 पेक्षाही कमी वेळा दिसली आहे.
मालपे मत्स्य बंदरात आणल्यानंतर हा मासा मंगळुरूच्या एका व्यापाऱ्याला विकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि लुप्तप्राय आणि संरक्षित प्रजातींच्या या माशाचा लिलाव केल्याने मच्छिमार अडचणीत येऊ शकतात. या माशाचा लिलाव केल्यास वाघाला मारल्यास जी शिक्षा देण्यात येते, तीच या मच्छिमारांना होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मत्स्य विभागाचे सहसंचालक गणेश के यांनी या घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
An extremely rare & endangered species of carpenter shark (sawfish) was caught in fishnets at Malpe on Thursday. 🦈
— Mangalore City (@MangaloreCity) March 12, 2022
The huge carpenter shark weighed around 250 kgs, was accidentally trapped in the nets of a boat named 'Sea Captain' that had left Malpe port to fish in deep waters pic.twitter.com/3AimndOv1I
या प्रजातीचे मासे त्यांच्या लांब आणि अरुंद नाकामुळे विशेष मानले जातात. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या मते, सॉफिश हा जगभरातील सर्वात धोक्यात असलेल्या सागरी माशांपैकी एक आहे. सर्व पाच सॉफिश प्रजाती लुप्तप्राय म्हणून सूचीबद्ध आहेत. त्यापैकी तीन गंभीरपणे धोक्यात आहेत. भारतात हा मासा पकडणे आणि याचा लिलाव करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. कारण हा मासा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित आहे.