Ram Navami 2023 : 'ही' आहेत भारतातील 10 प्रसिद्ध राम मंदिरं; संपूर्ण यादी पाहा
Ram Navami 2023 : भगवान राम यांचा जन्मदिवस म्हणून देशभरात राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, थाटामाटात साजरा केला जातो.
Ram Navami 2023 : श्रीराम नवमीला (Ram Navami 2023) हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. भगवान राम यांचा जन्मदिवस म्हणून देशभरात राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, थाटामाटात साजरा केला जातो. यंदा गुरुवारी म्हणजेच 30 मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. काही ठिकाणी तर उत्सवाला सुरुवातही झाली आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच हा दिवस दरवर्षी भगवान रामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. " प्रभू रामाचा जन्म त्रेतायुगात झाला होता आणि मानवाच्या रूपात पूजा केली जाणारी सर्वात जुनी देवता म्हणूनही ओळखली जाते. संपूर्ण भारतभर भगवान रामाला समर्पित विविध मंदिरे आहेत त्यापैकी काही प्रसिद्ध मंदिरांची नावं जाणून घेऊयात.
1. अयोध्या राम मंदिर, उत्तर प्रदेश
भारतातील अयोध्या मंदिर भारतातील एक प्राचीन राम मंदिर आहे. असं म्हणतात की, अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे. ज्यामुळे अयोध्यामधील राम मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या या प्राचीन शहरातील शरयू नदीच्या काठी हे राममंदीर वसलेले आहे. भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तीर्थक्षेत्रापैकी एक हे मंदिर आहे. ज्यामुळे आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रामभक्तांची गर्दी असते. आता या मंदिराच्या पुर्ननिर्मितीचं काम सुरू असून लवकरच भव्य दिव्य श्रीराम मंदिराची निर्मिती केली जाणार आहे.
2. राम राजा मंदिर, मध्य प्रदेश
भारतातील आणखी एक प्रसिद्ध राम मंदिर मध्य प्रदेशच्या ओरछा या शहरात आहे. हे मंदिर झाशी रेल्वे स्टेशनपासून फक्त तेरा किलोमीटरवर आहे. बेतवा नदीच्या काठी ते वसलेलं आहे. राम राजा मंदिर भारतातील एकमेव असं मंदिर आहे जिथे श्रीरामाची एक राजाच्या रूपात पूजा केली जाते. रामनवमी हा या शहरातील एक प्रमुख सण आहे. त्यामुळे रामनवमीला या शहराचं रूप पाहण्यासारखं असतं. या मंदिरात श्रीरामाप्रमाणेच सीता, लक्ष्मण आणि महाराज सुग्रीव आणि भगवान नरसिंह, भगवान हनुमान आणि जामवंताच्या मूर्तीचीही मनोभावे पूजा केली जाते.
3. सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा
सीता रामचंद्र मंदिर भारताच्या तेलंगणा राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध श्रीरामाच्या मंदिरांपैकी एक असून ते गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे. सीता रामचंद्रस्वामी मंदिर हैदराबादपासून तीनशे किलोमीटरवर आहे. सीतारामस्वामी मंदिर एक प्राचीन मंदिर असून त्यामध्ये चारशे वर्षांचा इतिहास दडलेला आहे. या मंदिरात रामनवमी आणि व्यंकटा एकादशी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
4. रामास्वामी मंदिर, तमिळनाडू
रामास्वामी मंदिर हे भारतातील प्रमुख राममंदिरांपैकी असून ते 16 व्या शतकातील आहे. या मंदिराचे बांधकाम सुबक आणि लक्षणीय आहे. तामिळनाडूमधील कुंभकोणममध्ये श्रीरामाचे हे मंदिर आहे. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं हे मंदिर आजही सुस्थितित असून या मंदिराची रचना आजही अनेक पर्यटकांना अचंबित करते. या मंदिरातही रामनवमीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात केला जातो.
5. काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र
भारतातील एक प्रसिद्ध राममंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्यात आहे. काळाराम मंदिर नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात श्रीरामाची वर्षानुवर्षे मनोभावे पूजा केली जाते. नाशिकमधील पंचवटीमध्ये आजही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात. काळाराम मंदिराची निर्मिती 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी केली. पूर्वी या मंदिराची बांधणी लाकडाची होती. मात्र, काळ्या दगडात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीदेखील काळ्या दगडाची असल्याने या मंदिराला काळाराम मंदिर अशी ओळख मिळाली. असं म्हणतात की, ही श्रीरामाची मूर्ती गोदावरीत सापडली आहे. रामनवमीला हजारो भक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये दाखल होतात.
6. त्रिपायर श्री राम मंदिर, केरळ
भारतातील आणखी एक प्रसिद्ध राममंदिर केरळमधील त्रिशूरमध्ये आहे. त्रिपायर नदीच्या काठी त्रिपायरमध्ये श्रीराम मंदिर कोडुन्गल्लुर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. केरळला देवभूमी समजले जाते. त्यामुळे हे स्त्रोतत्रिपायर श्रीराममंदिर भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा त्रिप्रयारप्पन म्हणजेच त्रिपायर थेवरच्या रूपात केली जाते. केरळमधील अनेक सुंदर मंदिरांच्या यादीत या मंदिराचा समावेश होतो. या मंदिरातील अरट्टूपुझा पूरम उत्सव प्रसिद्ध आहे.
7. राम मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा
ओडीसामधील भुवनेश्वरच्या खारावेलमध्ये हे राम मंदिर आहे. शहराच्या अगदी मध्यभागी वसलेलं हे राम मंदिर भारतातील प्रसिद्ध राम मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या सुंदर मूर्ती आहेत. हे मंदिर एका खाजगी ट्रस्टद्वारे बांधण्यात आलेलं असून त्याची देखभालही याच ट्र्स्टद्वारे घेण्यात येते. या ठिकाणी दरवर्षी रामनवमीला भक्तांचा प्रंचड ओघ इथे सुरू असतो.
8. कोदंडराम मंदिर, कर्नाटक
कोदंडारामस्वामी मंदिर हे भारतात कर्नाटकमधील चिक्कमगलुरू या थंड हवेच्या ठिकाणी वसलेलं आहे. बंगलोरपासून ते जवळजवळ 250 किलोमीटरवर आहे. या मंदिरामध्ये धर्नुधारी श्रीराम आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. श्रीरामाच्या धनुष्याला कोदंडा असं म्हणतात म्हणून या मंदिराचं नाव कोदंडारामस्वामी असं असावं. या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात चोल राजांनी केली. असं म्हणतात लंकेवरून परतल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी थांबले होते.
9. रामटेक मंदिर, नागपूर, महाराष्ट्र
रामटेक हे भारतातील एक असे राममंदिर आहे जे महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. नागपूर रेल्वेस्टेशनपासून जवळपास 54 किलोमीटरवर हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची ख्याती आहे. असं म्हणतात की, पावसाळ्यामध्ये जवळजवळ चार महिने श्रीराम या ठिकाणी वास्तव्यास होते. अशीही आख्यायिका आहे की या ठिकाणी साधना केल्यामुळे श्रीरामाला अध्यात्मिक ज्ञान आणि ब्रम्हास्त्राचे ज्ञान अवगत झाले होते. त्यामुळे या स्थळाला एक दैवी महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजही रामनवमीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी येतात.
10. रघुनाथ मंदिर, जम्मू
रघुनाथ मंदिर हे जम्मू काश्मिरमध्ये असून हे भारतातील एक प्रसिद्ध राम मंदिर आहे. रघुनाथ मंदिर ही संपूर्ण जम्मू काश्मिरची एक ओळख मानली जाते. या राम मंदिराची निर्मिती 1835 साली महाराजा गुलाब सिंह यांनी सुरू केली पुढे महाराजा रणजीत सिंह यांच्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण झाले. रघुनाथ मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली वास्तुकला आहे. शिवाय या मंदिरातील आतील भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. या मंदिरात सात ऐतिहासिक धार्मिक स्थळे असल्यामुळे ती पाहण्यासाठी लाखों पर्यंटकांची गर्दी होत असते. या मंदिरातील रामनवमीचा उत्सव पाहण्यासारखा असतो.
महत्त्वाच्या बातम्या :