नवी दिल्ली : 21 मे 1991 चा दिवस... तसा हा दिवस रोजच्या सामान्य दिवसाप्रमाणेच उजाडला पण हा दिवस संपताना मात्र संपूर्ण देशाला धक्का बसला. याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम या संघटनेनं हत्या घडवून आणली. चेन्नईजवळच्या श्रीपेरंबदूर या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराला गेले असताना राजीव गांधी यांना हार घालण्यासाठी एक महिला पुढे आली आणि तिने आपल्या जवळील बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यातच राजीव गांधींचा मृत्यू झाला. 


देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नातू आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र असलेल्या राजीव गांधींनी ब्रिटनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं होतं. 1966 साली ते पायलट बनले. राजकारणात यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. पण संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर 1980 साली त्यांना नाईलाजास्तव राजकारणात यावं लागलं. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लोकसभेच्या तीन-चतुर्थांश जागा जिकल्या होत्या. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. मधल्या काळात त्याच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि काँग्रेसला लोकसभेत पराभव पत्करावा लागला. 1991 साली व्हीपी सिंग यांचे सरकार पडल्यानंतर देशात निवडणुकीच्या घोषणा झाल्या आणि राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान बनतील असं वातावरण निर्माण झालं. 


श्रीलंकेतील गृहयुद्ध
श्रीलंकेतीत उत्तर भागात, जाफना प्रातांत तामिळ अल्पसंख्य लोक राहतात तर उर्वरित भागात सिंहली लोकांचे प्रमाण बहुसंख्य आहे. या दोन भाषकांतील वाद चिघळला आणि तामिळ लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ लागला. सिंहली लोकांच्या सरकारी आणि लष्करी अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून प्रभाकरनच्या नेतृत्वाखाली लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेची स्थापना 1980 साली करण्यात आली. ही एक प्रकारची बंडखोर संघटनाच होती. 


भारतामध्ये, खासकरुन तामिळनाडूमध्ये मात्र श्रीलंकेतील या गृहयुद्धाकडे सहानुभूतीच्या नजरेतून पाहिलं जात होतं. अशातच 1983 साली श्रीलंकेत लष्करातील काही सैनिकांची हत्या करण्यात आली. लष्कराने त्याचा सूड म्हणून श्रीलंकेतील तामिळ लोकांचा नरसंहार घडवून आणला. 


राजीव गांधी-जयवर्धने करार आणि शांतीसेना
श्रीलंकेतील या स्थितीवर भारत नजर ठेऊन होता. तत्कालीन भारतीय पंतप्रधान राजीव गांधींना या प्रदेशात शांतता नांदावी असं वाटत होतं. त्यामुळे 29 जुलै 1987 रोजी त्यांनी श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष जयवर्धने यांच्यासोबत एक करार केला. हा करार भारत-श्रीलंका करार किंवा राजीव गांधी-जयवर्धने करार या नावाने ओळखला जातो. या करारांतर्गत भारताने श्रीलंकेत शांतता नांदावी यासाठी शांतीसेना पाठवायचा निर्णय घेतला.  राजीव गांधींच्या याच निर्णयामुळे पुढे त्यांची हत्या करण्यात आली. 


भारतीय शांतीसेना तामिळ वंशाच्या लोकांविरोधात लढत होती. यामध्ये दोन्हीकडून नुकसान झालं ते भारताचंच. कारण एकीकडे श्रीलंकेतील तामिळ लोकांमध्ये भारतद्वेष निर्माण झाला होता आणि दुसरीकडे भारतीय जवानांची हत्याही होत होती. 


राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान बनण्याची शक्यता होती
दिल्लीमध्ये राजीव गांधी सरकार बदललं आणि व्हीपी सिंग सरकार आलं. त्यांनी भारतीय शांतीसेना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. पण राजीव गांधींनी आपली श्रीलंकेची भूमिका कायम ठेवली होती. भारतातील व्हीपी सिंग सरकार पडले आणि पुन्हा निवडणुकीची घोषणा झाली. अशात राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता जास्त होती. जगभरातल्या अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी तशा प्रकारचे अहवाल आपापल्या सरकारांना दिले होते. त्यामुळे लिट्टेमध्ये अस्वस्थता वाढू लागली आणि त्यांनी राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्याचा निर्णय घेतला. 


राजीव गांधींच्या हत्येची योजना
शिवसरन नावाच्या एका लिट्टेच्या नेत्याने राजीव गांधींच्या हत्येची योजना तयार केली. त्याला प्रभाकरनने हिरवा कंदील दाखवला. त्यांनी आपल्या एकेक कार्यकर्त्यांना भारतात पाठवण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यात कम्युनिकेशन सुरु राहिल याची खातरजमा केली. या हत्येसाठी लागणारी रंगीत तालीमही या लोकांनी केली होती. त्यासाठी मे 1991 मध्ये चेन्नईमधील व्हीपी सिंग यांच्या सभेमध्ये सुरक्षा कवच भेदून जाण्यामध्ये हे लिट्टेचे दहशतवादी यशस्वी झाले होते. गुप्तचर खात्याने असंही सांगितलं आहे की, धनु आणि सुबा या लिट्टेच्या मानवी बॉम्बनी त्यावेळी व्हीपी सिंग यांच्या गळ्यात हारही घातला होता. 


श्रीपेरंबदूर या ठिकाणी 21 मे रोजी राजीव गांधी सभा घेणार असल्याचं स्पष्ट झालं. भारतीय गुप्तचर खात्याला या हत्याकांडाची कुणकुण लागली असल्याचं सांगण्यात येतंय. तशा प्रकारचा अहवाल देऊन राजीव गांधींनी ही प्रचारसभा करु नये असाही निरोप देण्यात आला होता. पण राजीव गांधींनी याकडे दुर्लक्ष करत प्रचारसभेला जायचं पक्कं केलं होतं. त्या प्रचारसभेत लिट्टेचे धनु आणि सुभा हे राजीव गांधींच्या जवळ जाण्यात यशस्वी ठरले. धनुने राजीव गांधींच्या गळ्यात हार घातला आणि त्यांच्या पाया पडायण्यासाठी खाली वाकण्याच्या निमित्ताने तिने बॉम्बचा स्फोट घडवून आणला. एका क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या स्फोटामध्ये राजीव गांधी यांच्यासोबत 16 लोकांचा मृत्यू झाला आणि 45 लोक गंभीर जखमी झाले.


आतापर्यंत राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी एकूण 26 जणांना दोषी ठरवून मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे होता पण 1999 साली त्यातील 19 जणांना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं. सात आरोपींना मृत्यूदंड तर इतर चार आरोपींना जन्मठेपाची शिक्षा देण्यात आली. नंतरच्या काळात तामिळनाडूच्या राज्यपालांनी मुख्य आरोपी नलिनीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत बदल केला आणि तिला जन्मठेपेची शिक्षा दिली. नलिनीला न्यायालयाने दया दाखवावी आणि तिला सोडून द्यावं यासाठी नुकतचं तामिळनाडूनचे नवीन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :