मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवारी) सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. 


मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल?



  • सकाळी 8.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन

  • सकाळी 8.40 वाजता तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक 

  • सकाळी 9.40  वाजता  हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन, नंतर गाडीने वायरी तालुका मालवणकडे जाणार

  • सकाळी 10.10 वाजता वायरी, ता.मालवण येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 

  • सकाळी 10.25 वाजता गाडीने मालवण येथे आगमन व तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी 

  • सकाळी 11.05 वाजता निवती, ता. वेंगुर्ला येथे तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

  • सकाळी 11.30 वाजता  चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे गाडीने आगमन आणि नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक 

  • चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

  • दुपारी 12.35 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण


Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका; शेकडो घरांची पडझड, तर लाखोंचं नुकसान


रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर अनेक ठिकाणी घरांच्या भिंती, झाडं कोसळली. तोक्ते चक्रीवादळामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काही लोक या वादळात जखमी झाले आहेत. 


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील बागायतीला फटका; 3 हजार 375 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्रशासनाकडून प्राथमिक माहिती


तोक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. 172 गावांमधील 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या एकूण 3 हजार 375 पूर्णांक 16 हेक्टर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे आंबा, काजू बागायतींचे झाले असल्याची माहिती अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.