मुंबई : सध्या देशभरात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत चाललं असलं तरी ते अद्याप आटोक्यात आलेलं नाही. दुसरीकडे कोरोना लसीकरणासाठी लसींचा तुटवडा हा कळीचा मुद्दा बनला आहे. अशात भारत बायोटेककडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. 20 कोटी लसीचं जास्तीचं उत्पादन गुजरातमधील अंकलेश्वर येथील चिरॉन बेहरिंगमध्ये होणार असल्याची माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली आहे. चिरॅान बेहरिंग ही भारत बायोटेकच्या मालकीची कंपनी आहे.
भारत बायोटेकने म्हटले आहे की कोवॅक्सिन लसींची अतिरिक्त उत्पादन क्षमता वाढविण्यात आली आहे. कारण देशात लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. गुजरातमधील अंकलेश्वर येथील भारत बायोटेकचे अनुदान असलेल्या चिरॉन बेहरिंगमध्ये 200 कोटी कोव्हॅक्सिन डोस प्रतिवर्षी तयार करण्याची योजना आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेत भर पडल्यास कोवॅक्सिन डोसची मात्रा प्रति वर्ष 1 अब्ज डोसपर्यंत जाईल, असं देखील कंपनीने म्हटले आहे. कंपनीने स्वत:च्या स्थापित केलेल्या कॅम्पसमध्ये क्षमता वाढवली आहे.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या निर्मितीला आता गती मिळणार
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या निर्मितीला आता गती मिळणार असून गुजरातमधील अहमदाबादच्या तीन कंपन्यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. या आधी आणखी सार्वजनिक कंपन्यांनी कोवॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे देशात लस निर्मितीला गती मिळणार आहे. गुजरात सरकारच्या मालकीच्या गुजरात बायोटेक रिसर्च सेंटर आणि खासगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या हेस्टर बायोसायन्स आणि ओम्नीबीआरएक्स बायोटेक्नॉलॉजी या कंपन्यांनी भारत बायोटेकशी कोवॅक्सिनच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी एका करार पत्रावर सह्या केल्या आहेत.