रत्नागिरी : 'साहेब, शब्द नको मदत करा!' ही भावना आहे तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील नागरिकांची. 'तोक्ते' आलं आणि सारं काही घेऊन गेलं. कुणाचं घर, कुणाची बाग उद्ध्वस्त झाली. अगदी वर्षभराच्या आतच कोकणाला निसर्ग चक्रीवादळानंतर 'तोक्ते'चा तडाखा बसला. त्यामुळे कोकणच्या किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं. काहींचा संसार या तोक्ते चक्रीवादळानं पूर्णत: उद्ध्वस्त करुन टाकला. घरावरचं छप्पर राहिलं नाही. घरात धान्य नाही. कपडा-लत्ता, सारा संसार गेला. आता करायचं तरी काय आणि जगायचं तरी कसं? हाच सवाल सध्या नुकसानग्रस्त कोकणवासियांसमोरचा आहे. सध्या पंचनामे सुरु आहेत. मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी देखील दौरे करत मदतीचं आश्वासन देत आहेत. पण मिळणारी मदत कधी आणि किती शिवाय कशाच्या रुपानं मिळणार? हे देखील पाहावं लागेल.
पंचनामे झाल्यानंतर सरकारकडून मिळणार मदत नुकसानीचा विचार करता नक्कीच तोकडी पडते. सरकारच्या देखील यामध्ये मर्यादा आहेत ही बाब मान्य. पण, मग यातून सावरायचं तरी कसं? हाच यक्ष प्रश्न आहे. पोटच्या मायेप्रमाणे वाढवलेल्या आणि वाढलेल्या पिढ्यानपिढ्याच्या बागा देखील उन्मळून पडल्या. हक्काचं आर्थिक साधन देखील गेलं. त्यामुळे सांगा कसा धीर धरायचा? हाच आर्त सवाल सध्या नुकसानग्रस्त कोकणवासियांच्या डोळ्यात आहे. रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्गात झालेलं नुकसान मोठं आहे. गावात वीज नाही. मोबाईलला नेटवर्क नाही. त्यामुळे संपर्क साधण्यावर देखील बंधन. निसर्ग चक्रीवादळापेक्षा यावेळचं नुकसान तुलनेनं कमी असेलही, पण, वर्षभरात एकामागून एक आलेल्या संकटांना तोंड तरी कसं द्यायचं आणि कशाच्या जोरावर? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या नुकसानग्रस्त कोकणच्या समोर उभी आहेत.
आर्थिक साधनच नाही; उभारी कशी घेणार?
'साहेब कोरोना आला. मुंबई-पुण्यात नोकरी करुन कमवते हात घरी बसले. काहींनी थेट गावची वाट धरली. कमाई थांबली आणि खाणारे चार हात आखणी वाढले. नोकरी होती म्हणून दोन पैसे हक्काचे होते, देखील बंद झाले! गावात हाताला काम नाही. लॉकडाऊन उठलं म्हणून शहराकडे वळलेल्या पोरांच्या, सुनांच्या, नातवांच्या पोटाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला. पर्यटन ठप्प, आंबा उशिरा आणि कमी प्रमाणात लागला. काजूला मोहोर आला पण भाव नाही. मासेमारीवर बंधनं. कोकणी मेव्यावर प्रक्रिया करुन हाताला काम मिळालं असतं तर ती देखील आशा मावळली. त्यात बागा उद्ध्वस्त झाल्या. गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचा धक्का आणि नुकसान मोठं होतं. त्यातून नव्या उमेदीसह सावरत होतो. तोच 'तोक्ते' आलं आणि उरलेलं देखील घेऊन गेलं. आता तुम्हीच सांगा जगायचं तरी कसं आणि उभं राहायाचं तरी कसं?' अशा एक ना अनेक प्रतिक्रिया नुकसानग्रस्त कोकणी माणसाच्या आहेत.
फडणवीसांच्या टीकेला 'दान'रुपी उत्तर
सध्या सर्वच पक्षीय नेते आणि मंत्री नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. याववेळी त्यांनी रत्नागिरी इथं बोलताना थेट शिवसेनेवर हल्लाबोल केला. कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं. पण, कोकणला देण्याच्या वेळी मात्र शिवसेनेनं कायमच हात आखडता घेतला. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी रत्नागिरीसारख्या मोठ्या जिल्ह्याला केवळ 150 कोटी रुपये मिळाले. इकडं एक एक जण आपल्या मतदारसंघात 500 ते 600 कोटी रुपये नेत आहे. अशा वेळी ही मदत तुटपुंजी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.