(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajasthan : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार का? गेहलोत सरकारच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा
Rajasthan : राजस्थानमध्ये उद्या होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यानी राजीनामा दिला आहे.
जयपूर : राजस्थानात नव्यानं मंत्रिमंडळ स्थापण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. उद्या राजस्थानच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये गेहलोत विरुद्ध पायलट असा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
उद्या होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाचे मंत्रिपद जाणार आणि कुणाचे राहणार यावर चांगलीच चर्चा सुरु आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सत्ता संघर्षात या तिघांच्या खुर्च्या गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, उद्या दुपारी 4 वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे प्रभारी अजय माकन हे राजस्थानमध्ये पोहोचले आहेत.
काँग्रेस नेते सचिन पायलट हे आधीच अशोक गहलोत यांच्या कारभारावर नाराज आहेत. गेहलोत हे पायलट समर्थकांना डावलतात अशी त्यांची तक्रार आहे. तसेच राजस्थानमध्ये 2023 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी सचिन पायलट प्रयत्नशील आहेत.
गेल्या वर्षी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांनी ही बंडखोरी केली होती. सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता.
राजस्थान हे काँग्रेसच्या हातात असलेलं मोठं राज्य आहे. या राज्यात भाजप पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर सचिन पायलट यांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे. त्यामुळे आता पंजाबप्रमाणे राजस्थामध्येही राजकीय भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
महत्त्वाच्या बातम्या :