वर्षभरात एक कोटी लोकांनी रोजगार गमावल्यामुळे मोदी आता नोकऱ्यांबाबत बोलत नाहीत; राहुल गांधींचा टोला
जयपूरमध्ये आयोजित 'युवा आक्रोश रॅली'दरम्यान राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार मिळवून देणार अशी घोषणा केली होती. परंतु गेल्या वर्षभरात देशातील एक कोटी तरुणांनी रोजगार गमावले आहेत.
जयपूर : देशातील तरुण हीच देशाची मोठी संपत्ती आहे. परंतु 21 व्या शतकात देशातील या संपत्तीचं आतोनात नुकसान झालं आहे. कारण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या देशातल्या युवकांना देशासाठी काहीही करण्याची संधी मिळत नाही. असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसने जयपूरमध्ये 'युवा आक्रोश रॅली'चे आयोजन केले होते. या रॅलीनंतर केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले की, देशाची खूप बिकट परिस्थिती आहे. देशातल्या तरुणांना त्याची जाणीव आहे. प्रत्येक देशाकडे एखादी संपत्ती, ठेवा असतोच. आपले तरुण हाच आपला ठेवा आहे. सर्वात जास्त आणि सर्वाधिक हुशार तरुण या देशात आहेत. संपूर्ण जगाने हे मान्य केलं आहे की, हे तरुण जग बदलू शकतात. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हाच तरुण बेरोजगार आहे.
मोदी सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार भारताच्या या संपत्तीचे (तरुणांचे) आतोनात नुकसान करत आहे. तरुणांना उद्देशून राहुल म्हणाले की, तुम्ही देशासाठी जे करु इच्छिता, आणि जे तुम्ही करु शकता, त्यासाठी हे सरकार तुम्हाला योग्य संधी देण्यात असमर्थ ठरलं आहे.
राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदींनी 2 कोटी तरुणांना रोजगार मिळवून देणार अशी घोषणा केली होती. परंतु गेल्या वर्षभरात देशातील एक कोटी तरुणांनी रोजगार गमावले आहेत. तरुणांचे रोजगार हिरावले गेले आहेत. परंतु मोदी आता रोजगारांबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की, ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. त्या ते पूर्ण करु शकले नाहीतच, पण जे चित्र पूर्वी होतं तेदेखील आता राहिलं नाही.
मोदी आणि त्यांचे मंत्री आता केवळ सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा ), एनआरसी (राष्ट्रीय नागरिक नोंदयादी) आणि एनपीआरबद्दल बोलतात. परंतु देशासमोर ज्या मोठ्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करत नाही. बेरोजगारी आणि आर्थिक मंदीबाबत मोदी आणि त्यांचे मंत्री बोलायला तयार नाहीत.
Rahul Gandhi in Jaipur: PM Modi had promised 2 crore jobs, but last year our youth lost 1 crore jobs. Wherever PM goes he talks of CAA, NRC but the biggest issue of unemployment is not mentioned, PM doesn't even speak a word on it. pic.twitter.com/nkS9saY9oL
— ANI (@ANI) January 28, 2020