(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींच्या याचिकेवर आज गुजरात हायकोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी, निकाल येण्याची शक्यता
Rahul Gandhi Defamation Case : मोदी आडनाव मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आव्हान याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत एम प्रचारक यांच्यासमोर दुपारी अडीच वाजता सुनावणी सुरु होईल.
Rahul Gandhi Defamation Case : मोदी आडनाव मानहानी प्रकरणी (Defamation Case) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आव्हान याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत एम प्रचारक यांच्यासमोर दुपारी अडीच वाजता सुनावणी सुरु होईल. 29 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी अनेक निर्णयांचा हवाला देत राहुल गांधी यांच्या वतीने युक्तिवाद केला होता. त्यात त्यांनी हा गंभीर गुन्हा नसल्याचं उच्च न्यायालयाला सांगितलं होतं. अशा परिस्थितीत शिक्षेला स्थगिती द्यावी, अन्यथा राहुल गांधी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असंही सिंघवी सांगितलं होतं. यावेळी सिंघवी यांनी काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू, भाजप नेते हार्दिक पटेल, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचाही उल्लेख केला.
हायकोर्टात सुमारे तीन तास झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणातील याचिकाकर्ते पूर्णेश मोदी यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागून घेण्यात आली. त्यावर न्यायमूर्ती हेमंत एम प्रचारक यांनी सोमवारी (1 मे) संध्याकाळपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती. पूर्णेश मोदींच्या वकिलांकडून साक्षीदारांची यादी आणि खटल्याशी संबंधित काही कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. मागील सुनावणीत न्यायमूर्ती हेमंत एम प्रचारक यांनी हे प्रकरण 2 मे रोजी संपवण्यास सांगितलं होतं. अशा परिस्थितीत न्यायमूर्ती हेमंत एम प्रचारक हे राहुल गांधींच्या अर्जावर निर्णय घेऊ शकतात.
आज कोर्टात काय होणार?
मानहानीच्या खटल्यातील दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या राहुल गांधींच्या याचिकेवर ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्या वतीने सर्व युक्तिवाद करण्यात आले आहेत. पूर्णेश मोदींच्या वतीने न्यायालयात नवा युक्तिवाद केला तर राहुल गांधी यांचे वकील त्याचा प्रतिवाद करतील. आज दुपारी अडीच वाजता न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुनावणीनंतर संध्याकाळी उशिरापर्यंत न्यायालय अपिलावर निकालही देऊ शकते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उच्च न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही, तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. तसंच न्यायमूर्ती हेमंत एम प्रचारक 5 मे पासून परदेशात जात असल्याने आज कोर्टात सुनावणी पूर्ण झाली तर 3 किंवा 4 मे रोजी ते निकाल देऊ शकतात.
सिंघवी न्यायालयात हजर राहणार
मोदी आडनाव मानहानी प्रकरणाच्या सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या टीमचे महत्त्वाचे सदस्य आणि उच्च न्यायालयातील वकील पंकज चंपाणेरी हेही त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी सिंघवी पुन्हा अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत. गेल्या सुनावणीत (29 एप्रिल) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्व युक्तिवाद केला होता.
राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा
मानहानी प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी सूरत सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने कोणताही दिलासा न दिल्याने राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान दोन वर्षांची शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द झाली आहे.
संबंधित बातमी