नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित राहणार
विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी जेडीएस नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इत्यादी नेत्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर नरेंद्र मोदी उद्या दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
राहुल गांधी, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निमंत्रण दिलं होतं. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी जेडीएस नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी पंतप्रधान आणि माजी राष्ट्रपतींनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
जवळपास सहा हजार मान्यवर उपस्थित राहणार
सहा हजार खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये 'बिम्सटेक' समुहातील आठ देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री, सिने-कलाकार अन्य मान्यवर असे मिळून सहा हजार पाहुणे याठिकाणी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, किर्गीजस्तानचे राष्ट्रपती तर नेपाळ, भूटान, मॉरिशसचे पंतप्रधान येणार आहेत.
ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे, मात्र त्या या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
आणखी वाचा
- मोदींच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता, 'हे' असतील संभाव्य मंत्री?
- नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे 'बिम्सटेक' देशांना निमंत्रण, 30 मे रोजी शपथविधी सोहळा
- मोदींच्या शपथविधीसाठी पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण
- नव्या सरकारमध्ये मला कोणतीही जबाबदारी देऊ नका, जेटलींचं मोदींना पत्र