(Source: Matrize)
Rahul Gandhi : 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयचा सन्मान पण...', राहुल गांधींवर मानहानीचा दावा करणाऱ्या पुर्णेश मोदींची प्रतिक्रिया
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या शिक्षेवर न्यायमूर्ती एस. गवई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली असून त्यांना दिलासा देण्यात आला आहे.
Purnesh Modi On Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडवानाच्या मानहानीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणाऱ्या पुर्णेश मोदी (Purnesh Modi) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे पण तरीही मी माझी लढाई सत्र न्यायालयामध्ये सुरु ठेवणार आहे. सर्वोच्च न्यायालायाने शुक्रवारी राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात देण्यात आलेल्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. यावर सर्वोच्च न्यायालायने म्हटलं की, ट्रायल कोर्टाने आणि गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचं कोणतही कारण सांगितलं नाही. त्यामुळे आम्ही या शिक्षेला स्थिगिती देत आहोत.
यावर पुर्णेश मोदींनी काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर पुर्णेश मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र सत्र न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकातील कोलारमधील निवडणूकीच्या रॅलीमध्ये संपूर्ण मोदी जातीचा अपमान केला होता. त्यामुळे आमची लढाई या अपमानाविरोधात आहे.'
पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'ट्रायल कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवलं आणि त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. परंतु तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ते गुजरात उच्च न्यायालयात गेले तिथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत निर्णय हा आमच्या बाजून होता.' अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत असे घडते की ट्रायल कोर्टाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीच्या शिक्षेला स्थगिती दिली जाते, असं देखील पुर्णेश मोदी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्यावर पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. त्यावर त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांचा खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे.