'तुम्ही माझ्यावर अन्याय केला...', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?
PM Modi Kanpur Visit : ज्या गावाने राष्ट्रपतींचे बालपण पाहिले आणि त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर जाताना पाहिले त्या गावाला भेट देऊन मला आनंद होत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
PM Modi Kanpur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. पंतप्रधानांनी अनेक विकासकामांचं उद्घाटनही केले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गावालाही त्यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. ज्या गावाने राष्ट्रपतींचे बालपण पाहिले आणि त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर जाताना पाहिले त्या गावाला भेट देऊन मला आनंद होत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. राष्ट्रपतींच्या जीवन प्रवासातील बलस्थानांचे त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यासमवेत कानपूरच्या पारौंख गावातल्या पाथरी माता मंदिरात भेट दिली. त्यानंतर त्यांनी डॉ. बी.आर. आंबेडकर भवनाला आणि मिलन केंद्राला भेट दिली. मिलन केंद्र हे राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे. ते सार्वजनिक वापरासाठी दान केले गेल्यानंतर त्याचे रूपांतर सामुदायिक केंद्रात (मिलन केंद्र) झाले. पारौंख गावातील सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
पारौंख गावच्या मातीतून राष्ट्रपतींना मिळालेले संस्कार आज जग पाहत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘संविधान’ आणि ‘संस्कार’ या दोन्हींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रपतींनी प्रोटोकॉल मोडून आणि हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करून पंतप्रधानांना आश्चर्यचकित केले. यावेळी प्रोटोकॉल मोडून स्वागत करणाऱ्या राष्ट्रपतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय.' /यावर पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या 'संस्कारांचे' आपण पालन करत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे आभार मानले.
भारतीय लोकशाहीच्या ताकदीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी मंचावरील चारही मान्यवर, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि यूपीचे मुख्यमंत्री हे खेड्यापाड्यातून किंवा छोट्या शहरांमधून उदयास आले आहेत, याकडे लक्ष वेधले. आमचा संघर्ष आणि गरिबी आणि ग्रामजीवनाशी थेट संपर्क यामुळे आमच्या संस्कारांना बळ मिळाले आहे, हीच आमच्या लोकशाहीची ताकद आहे, "भारतात खेड्यात जन्मलेला गरीब माणूसही राष्ट्रपती-पंतप्रधान-राज्यपाल-मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचू शकतो" असे मत त्यांनी मांडले.
लोकशाहीच्या बळाच्या संदर्भात पंतप्रधानांनी घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध इशारा दिला. ते म्हणाले की, घराणेशाहीचे राजकारण हे केवळ राजकारणातच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभांचा गळा घोटून टाकते आणि नवीन प्रतिभेला वाढण्यापासून रोखते. कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही व्यक्तीविषयी आपल्याला वैयक्तिक द्वेष नाही. देशात मजबूत विरोधी पक्ष असावा आणि लोकशाहीला वाहिलेले राजकीय पक्ष असावेत, अशी माझी इच्छा आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.