सर्व ईव्हीएम मशीन्स स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
निवडणूक आयोगाने गाझीपूर व्यतिरिक्त चंदौली, डुमरियागंज आणि झांसी येथील घटनांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचीही मदत घेतला.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या 'स्ट्राँगरुम'मधील ईव्हीएम मशीन्ससोबत झेडछाड आणि गडबडी झाल्याचा आरोप महाआघाडीचे (बसपा-सपा) उमेदवार अफझल अन्सारी यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.
सोशल मीडियावर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. मतदानानंतर प्रत्येक ईव्हीएम मशीन तेथील उमेदवारांसमोर सील करण्यात आल्या होत्या. त्याचं व्हिडीओ शूटिंगही करण्यात आलं आहे. याशिवाय ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही उपस्थित होते. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचे आरोप चुकीचे असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
देशातील विविध भागातून ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याबाबत विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. या प्रत्येक आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील आरोपांबाबत निवडणूक आयोगाने म्हटलं की, ईव्हीएमवरील आरोपांबाबतचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने गाझीपूर व्यतिरिक्त चंदौली, डुमरियागंज आणि झांसी येथील घटनांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांचीही मदत घेतला.
ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुमच्या सुरक्षेसाठी त्याठिकाणी 24 तास सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांचे प्रतिनिधीही तेथे थांबू शकतात, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण ?
सोशल मीडियावर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ईव्हीएम मशीन खासगी गाडीत नेत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर चंदौली, डुमरियागंज आणि झांसी येथेही अशाचा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं.