काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीदरम्यान जवानाने चिमुकल्याला वाचवलं!
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला. या घटनेतील काही फोटो समोर आले आहेत. एक फोटो मनाला स्पर्शून जातो, तर दुसरा फोटो हृदय पिळवटून टाकतो.
सोपोर : जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला झाला. यात एक जवान शहीद झाला तर एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेतील काही फोटो समोर आले आहेत. एक फोटो मनाला स्पर्शून जातो, तर दुसरा फोटो हृदय पिळवटून टाकतो. दहशतवाद्यांच्या गोळ्यांपासून वाचवण्यासाठी एक जवान तीन वर्षांच्या चिमुकल्याला उचलून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये हाच चिमुकला आपल्या आजोबांच्या मृतदेहावर निर्विकार चेहऱ्याने बसलेला दिसत आहे.
रक्ताने माखलेल्या आजोबांच्या मृतदेहावर बसलेला चिमुकला
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृतदेहावर त्यांचा तीन वर्षीय नातू बसलेला फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरील हा फोटो म्हणजे कोणीतरी काळजावर घाव घालावे असाच आहे. जमिनीवर पडलेलं मृत शरीर, कपडे रक्ताने माखलेले आणि मृतदेहावर बसलेला तीन वर्षांचा चिमुकला, असा हा फोटो आहे.
जम्मू काश्मीर - सोपोरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
दहशतवाद्यांविरोधात पोझिशन घेतलेल्या जवानाजवळ जाताना चिमुकला
त्यानंतरच्या फोटोमध्ये हा चिमुकला आजोबांच्या मृतदेहाशेजारी असलेल्या एका जवानाजवळ जाताना दिसत आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोझिशन घेतलेला हा जवान मुलाला दुसऱ्या बाजूला जाण्याचा इशारा करताना दिसत आहे.
जवान आणि चिमुकल्याचा फोटो व्हायरल
यानंतर पोलिसांच्या टीममधील एका सदस्याने मुलाला उचलून एन्काऊंटर साईटपासून दूर नेलं. दहशतवाद्यांच्या गोळीबारादरम्यान समोर आलेला जवान आणि चिमुकल्याचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जवान मुलासोबत बोलताना दिसत आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि जवान त्याच्याशी बोलताचा हा फोटो मनाला स्पर्श करतो.
Security forces take a child out of terror strike site in Baramulla after his relative was shot by Terrorists...This is what terrorists have given to Kashmir...Heart goes out to the kid... pic.twitter.com/geI8WCmNNR
— Ashish K Singh (ABP News) (@AshishSinghLIVE) July 1, 2020
सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरच्या सीआरपीएफच्या 179 बटालियनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी पेट्रोलिंग पथकावर हल्ला केला. पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जवान गंभीररित्या जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.