एक्स्प्लोर
परदेश दौऱ्यांना ब्रेक, 2019 मध्ये मोदींचे निवडणुकांवर लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 मध्ये एकाही विदेश दौऱ्यावर जाणार नाहीत. मोदींनी आगामी लोकसभा निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांच्या परदेश दौऱ्यांची सातत्याने चर्चा झाली. पण 2019 या निवडणुकीच्या वर्षात मोदींनी आपल्या परदेश दौऱ्यांना चांगलाच ब्रेक लावल्याचं दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या चार महिन्यांत मोदी एकही परदेश दौरा करणार नाहीत. केवळ निवडणुका हाच फोकस ठेवून ते काम करणार असल्याने परदेश दौरा होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
2014 नंतर आत्तापर्यंत मोदींचे जवळपास 48 परदेश दौरे झाले आहेत. सरासरी काढली तर वर्षाला 12 आणि महिन्याला एकदा ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या परदेश दौऱ्यांची सोशल मीडियात जोरदार चर्चाही सुरु असायची. पण 2019 च्या पहिल्या चार महिन्यांत मोदींचा एकही परदेश दौरा नियोजित नाही. पंतप्रधान असले तरी मोदी हेच भाजपचे स्टार प्रचारक आहेत, त्यामुळेच परदेश दौऱ्यांऐवजी त्यांनी निवडणुकीलाच प्राथमिकता दिल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर जी अधिकृत आकडेवारी आहे, त्यानुसार मोदींचे आत्तापर्यंत 48 परदेश दौरे झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक दौऱ्याचा भाजपने अगदी खुबीनं वापर करुन घेतला. एनआरआय व्होटर डोळ्यासमोर ठेऊनही कार्यक्रम प्रत्येक दौऱ्यात आखले गेले. पण पुढचं वर्ष निवडणुकीचं आहे, त्यामुळेच मोदींनी आता आपला मोर्चा पूर्णपणे देशाकडेच वळवला आहे.
पुढच्या चार महिन्यांत जे परदेश दौऱ्यातले कार्यक्रम आहेत, त्यात स्वत: पंतप्रधानांनीच हजर राहायला हवं असे कार्यक्रम फारसे नाहीत. त्यामुळे सध्या तरी एकही दौरा नियोजित नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयांनी दिली आहे. उदंड जाहले परदेश दौरे अशी टीका होत असतानाच आता या नव्या माहितीवर मित्रपक्षही टोलेबाजी करताना दिसतात.
2018 या एका वर्षात मोदींचे 14 परदेश दौरे झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात ते जपानला होते. तर आसियान शिखर परिषदेसाठी सिंगापूरला गेले होते. नोव्हेंबरमध्ये जी 20 समिटसाठी अर्जेन्टिनाचाही दौरा त्यांनी केला होता. पुढच्या महिन्यात 21 तारखेला वाराणसीमध्ये प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन हा त्यांचा एक महत्वाचा कार्यक्रमही पार पडत आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानातली सत्ता गमावल्यानंतर आता 2019 साठी भाजपला अधिक ताकदीने उतरावं लागणार आहे. लोकसभेची निवडणूक एप्रिल-मे च्या दरम्यान होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता पुढच्या चार महिन्यात मोदी कुठेही देशाबाहेर टेक ऑफ न करता आपले पाय जमिनीवरच रोवून मैदानात उभे राहणार आहेत. सर सलामत तो पगडी पचास या न्यायाने पुन्हा परदेश दौरे करण्याआधी मूळात आपली सत्ता टिकवून ठेवायला हवी, अशी खूणगाठ त्यांनी बांधल्याचं दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement