पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणार नाही : परराष्ट्र मंत्रालय
शांघाई सहकार संघटनेचं संमेलन 13 आणि 14 जून रोजी पार पडणार आहे, त्यासाठी पंतप्रधान बिश्केकला जाणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील या शांघाई सहकार संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाई सहकार संघटनेच्या संमेलनाला पाकिस्तानच्या हवाई मार्गे जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष विमान किर्गिस्तान मार्गे जाणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं आहे.
नरेंद्र मोदींचं विशेष विमान आता ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशांतून किर्गिस्तानची राजधानी बिश्केकला जाणार आहे. आधी विमान प्रवासाठी दोन हवाई मार्गांचा विचार सुरु होता. मात्र आता पाकिस्तानातून न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
शांघाई सहकार संघटनेचं संमेलन 13 आणि 14 जून रोजी पार पडणार आहे, त्यासाठी पंतप्रधान बिश्केकला जाणार आहेत. नरेंद्र मोदींचं विमान पाकिस्तान मार्गे बिश्केकला जाणार असल्याची माहिती आधी समोर आली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही त्यासाठी परवानगी दिली होती. मात्र ऐनवेळी निर्णय बदलण्यात आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील या शांघाई सहकार संघटनेच्या संमेलनात सहभागी होणार आहेत.