PM मोदींच्या हस्ते आज 'सूरत डायमंड बोर्स'चं उद्घाटन; वाराणसीला 19,150 कोटींची भेट मिळणार
पंतप्रधान मोदी आज सूरत आणि वाराणसीला भेट देणार आहेत. ते जगातील सर्वात मोठी ऑफीस बिल्डिंग 'सूरत डायमंड बोर्स' आणि सूरतमधील नव्या विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन करतील.
PM Narendra Modi To Inaugurate Surat Diamond Bourse Today : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सूरत (Surat) आणि वाराणसीच्या (Varanasi) दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आज 17 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता सूरत विमानतळावरील इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन करतील. पंतप्रधान सकाळी 11.15 वाजता सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करतील. सूरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्यानं बांधलेल्या इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगची रचना पीक अवर्सच्या वेळी 1200 डोमेस्टिक आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एकाच वेळी हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच, या रचनेमुळे इमारतीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता 55 लाखांपर्यंत वाढली आहे.
सूरतची स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन इंटीग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगची रचना करण्यात आली आहे. श्रेणीसुधारित टर्मिनल भवनाच्या दर्शनी भागात सूरत शहरातील 'रांदेर' भागातील जुन्या घरांच्या समृद्ध आणि पारंपारिक लाकडी कामाचं चित्रण केलं आहे, जेणेकरून प्रवाशांना शहराची चव चाखता येईल. सूरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत GRIHA IV मॉडेल अंतर्गत बांधण्यात आली आहे. ही दुहेरी इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, ऊर्जा बचतीसाठी छत, कमी उष्णता वाढवणारे डबल ग्लेझिंग युनिट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि सोलार पॉवर प्लांट यांसारख्या सुविधांनी सुसज्ज आहे.
सुरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग
सूरत डायमंड बोर्सचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. हिरे आणि त्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जगातील सर्वात मोठं आणि आधुनिक केंद्र असेल. कच्चे आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल. डायमंड बोर्समध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सिक्योर वॉल्टची सुविधा आहेत.
यानंतर पीएम मोदी वाराणसीला पोहोचतील आणि दुपारी 3.30 वाजता विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी होतील. संध्याकाळी 5:15 वाजता ते नमो घाट येथे काशी तमिळ संगम 2023 चे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:45 वाजता वाराणसीतील स्वर्वेद महामंदिराला भेट देतील, त्यानंतर ते सकाळी 11:30 वाजता सार्वजनिक कार्यक्रमात उद्घाटन करतील. यानंतर, दुपारी 2:15 वाजता, पंतप्रधान सार्वजनिक कार्यक्रमात 19,150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधानांच्या हस्ते डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन
यावेळी पंतप्रधान कन्याकुमारी-वाराणसी तामिळ संगम ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ते काशी संसद क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सहभागी झालेल्यांचे काही क्रीडा कार्यक्रम थेट पाहतील. त्यानंतर ते कार्यक्रमातील विजेत्यांशी संवादही साधतील. कार्यक्रमादरम्यान ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधणार आहेत. अंदाजे 10,900 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नव्या पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर-नवीन भाऊपूर समर्पित फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. पंतप्रधान ज्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करतील त्यात बलिया-गाझीपूर सिटी रेल्वे लाईन दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. इंदरा-दोहरीघाट रेल्वे लाईन गेज परिवर्तन प्रकल्पाचा समावेश आहे.