PM Modi : 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : मोदी
PM Modi Speech : देशातील 70 हजार तरुणांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला.
PM Modi Speech At Rozgar Mela : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 70 हजार तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आज 13 जून रोजी पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिलं आहे. यामुळे या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला आहे. विविध सरकारी विभागात या तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
70 हजार तरुणांना मिळाला रोजगार
पंतप्रधान मोदी यांनी आज सुमारे 70 हजार युवांना नवनियुक्ती पत्र सुपूर्द केलं आहे. या तरुणांना सरकारकडून विविध नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला लागल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला संबोधित केलं. या रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांचा हक्काचं रोजगाराचं साधन उपल्ध झालं आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं की, रोजगार मेळाव्यामुळे एनडीए (NDA) आणि भाजप सरकारला नवी ओळख मिळाली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'भाजपशासित सरकारेही अशा रोजगार मेळाव्याचे सातत्याने आयोजन करत आहेत, याबद्दल मला आनंद आहे. सध्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. येत्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं तुमचं लक्ष्य आहे.'
मैं आज नियुक्ति पत्र पाने वाले सभी युवाओं को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं देता हूं: PM @narendramodi pic.twitter.com/XxJmbOejeh
— PMO India (@PMOIndia) June 13, 2023
तरुण आता इतरांना नोकऱ्या देत आहेत : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्टार्ट अप कंपन्यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, ''स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडिया सारख्या उपक्रमांमुळे तरुणांची क्षमता आणखी वाढवली आहे. मुद्रा योजनेने करोडो तरुणांना मदत केली आहे. सरकारकडून मदत मिळालेले हे तरुण आता स्वतः अनेक तरुणांना नोकऱ्या देत आहेत.''
घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : मोदी
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांवर निशाणा साधत म्हटलं की, ''देशात सुरू असलेली ही रोजगार मोहीम पारदर्शकता आणि सुशासनाचाही पुरावा आहे. आपल्या देशातील राजकीय पक्षांनी प्रत्येक बाबतील घराणेशाहीला कसं प्रोत्साहन दिलं, हे आपण पाहिलं आहे. सरकारी नोकऱ्यांसाठीही ते घराणेशाही आणि भ्रष्टाचारात गुंतले होते. या पक्षांनी देशातील करोडो जनतेचा विश्वासघात केला आहे. आमच्या सरकारनेही पारदर्शकता आणली आणि आम्ही घराणेशाही संपवली.''
दशकापूर्वीच्या तुलनेनं भारत अधिक मजबूत
पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितलं की, ''आज भारत सरकार आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी ओळखलं जात आहे. आज भारत हा एक दशकापूर्वीच्या तुलनेनं अधिक स्थिर, सुरक्षित आणि मजबूत देश आहे. आज संपूर्ण जग आपल्या विकासाच्या प्रवासात आपल्यासोबत चालण्यास तयार आहे. आज भारतात खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रात सतत नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. स्वयंरोजगारासाठीही मोठ्या संख्येने भारतीय तरुण पुढे येत आहेत.''