(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narendra Modi : राजस्थानमधील मंदिराच्या दानपेटीत PM मोदींनी टाकलेल्या लिफाफ्यात किती रुपये? आठ महिन्यानंतर झाली पैशांची मोजणी
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या सुरूवातीला राजस्थानमधील भिलवाडामधील मालासेरी डुंगरी या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी एक पांढरा लिफाफा दानपेटीत टाकला होता.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची देवाप्रति भक्ती ही त्यांच्या वागण्यातून व्यक्त होते. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला आवर्जून भेट देतात. त्यांनी या वर्षीच्या सुरुवातीला राजस्थानमधील भिलवाडा (Bhilwara) या शहराला भेट दिली होती. त्या ठिकाणी असलेल्या गुर्जर समाजाचे आराध्य दैवत मालासेरी डुंगरी या मंदिराला (Devnarayn temple at Rajasthan) त्यांनी भेट दिली आणि त्या ठिकाणच्या दानपेटीत एक लिफाफा टाकला. मोदींनी या लिफाफ्यात किती रुपये दान केले असतील याची उत्सुकता सर्वांनाच होती. तब्बल आठ महिन्यानंतर मंदिर प्रशासनाने हा लिफाफा खोलला असून त्यामध्ये पंतप्रधान मोदींनी 21 रुपये दान केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये 20 रुपयांची नोट आणि एक रुपया अशी रक्कम होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी जानेवारी महिन्यात राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील आसिंद तालुक्यात असलेल्या मालसेरी डुंगरी येथे गेले होते. येथे त्यांनी पूजाअर्चा करून मंदिराच्या दानपेटीत पांढरा लिफाफा टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या लिफाफ्यावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु मंदिराच्या नियमानुसार वर्षातून एकदाच दानपेटी उघडली जाते. त्यामुळे आठ महिन्यानंतर ही दानपेटी नुकतीच उघडण्यात आली आहे. दानपेटीत सुमारे 19 लाख रुपये सापडले.
पुजाऱ्याने सांगितले, मोदींचा पाढंरा लिफाफा
दानपेटीत मिळालेल्या एकूण देणग्यांची मोजणी सुरू आहे. पण दरम्यानच्या काळात दानपेटीत तीन लिफाफेही सापडले आहेत. मंदिराच्या पुजाऱ्याने दावा केला आहे की सापडलेले तिन्ही लिफाफे वेगवेगळ्या रंगांचे असून त्यात पीएम मोदींचा लिफाफा पांढरा होता. पुजार्याने दानपेटीतून हा लिफाफा काढला आणि सर्वांसमोर उघडला. त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. पीएम मोदींच्या शेवटच्या पाकिटात काय सापडणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.
पुजार्याने हा लिफाफा उचलून सर्वांसमोर दाखवला. यानंतर त्याने हा पांढरा लिफाफा उघडला. पाकिटातील रक्कम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुजारी हेमराज पोसवाल यांनी सांगितले की, व्हिडीओमध्ये पीएम मोदी पांढऱ्या रंगाचा लिफाफा टाकताना दिसत होते. यावरून असा अंदाज लावला जात आहे की हा तोच लिफाफा होता जो पीएम मोदींनी ठेवला होता. दानपेटीतून सापडलेल्या तीन लिफाफ्यांपैकी एका लिफाफ्यात 101 रुपये, एका लिफाफ्यात 2,100 रुपये आणि पांढऱ्या पाकिटात 21 रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.
भगवान देवनारायण यांचे जन्मस्थान
मालसेरी डुंगरी हे गुर्जर समाजाचे उपासक भगवान देवनारायण यांचे जन्मस्थान मानले जाते. अकराशे वर्षांपूर्वी भगवान देवनारायण यांच्या आईने या ठिकाणी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. त्यानंतर भगवान विष्णू स्वतः देवनारायणाच्या रूपात येथे प्रकट झाले. त्यामुळे या मंदिरावर संपूर्ण गुर्जर समाजाची विशेष श्रद्धा आहे.