'कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, त्यावरुन राजकारण नको' : पंतप्रधान मोदी
कोरोना लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi on Corona Vaccine) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली.
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी नीती आयोगाने येणाऱ्या लसीची निर्मिती, वितरण याबाबत सादरीकरण केले. यावेळी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असेही त्यांनी सांगितले.
वितरणासाठी प्रत्येक राज्याने तयारीला लागावे आगामी काळात कोरोना लसीच्या वितरणासाठी प्रत्येक राज्याने आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी दिल्या. लस वितरणात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लशीचे वितरण राज्यांतील यंत्रणेच्या माध्यमातूनच पार पडणार आहे. या कामात राज्यांचा अनुभव कामी येणार आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, आपल्यासाठी कोरोना लसीच्या वेगवान वितरणाबरोबरच लोकांचा जीव वाचवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस 100 टक्के सुरक्षित आहे, हे शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर ती भारतीयांना देण्यात येईल. राज्यांच्या सहकार्याने लसीचे वितरण केले जाईल. त्यामुळे राज्यांनी कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उभारण्यासाठी कामाला लागावे, अशी सूचना देखील पंतप्रधान मोदी यांनी केली.
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्स, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत माहिती
'कोरोना काळात पक्षांना राजकारण न करण्याच्या सूचना द्या', मुख्यमंत्री ठाकरे
रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे आणि राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
'कोरोना काळात पक्षांना राजकारण न करण्याच्या सूचना द्या', मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी