(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून पंतप्रधान मोदी सूर्यग्रहण पाहू शकले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू वर्षातलं (2019) आणि या दशकातलं (2010 ते 2019) शेवटचं सूर्यग्रहण पाहू शकले नाहीत.
नवी दिल्ली : चालू वर्षातलं (2019) आणि या दशकातलं (2010 ते 2019) शेवटचं सूर्यग्रहण आज पाहायला मिळालं. मुंबईतून सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरुवात होणार आहे. सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी ग्रहणमध्य झाले. तर सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटले. देशभरातील लाखो लोकांनी आज सूर्यग्रहण पाहीले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र थेट सूर्यग्रहण पाहू शकले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहणार होते, त्यासाठी त्यांनी तयारीदेखील केली होती. परंतु ढगाळ वातावरणामुळे त्यांना थेट सूर्यग्रहण पाहता आले नाही. अखेर मोदींना टीव्हीवरील लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे सूर्यग्रहण पाहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीवर सूर्यग्रहण पाहिले.
आज पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील देशांमधील (भारत, सौदी अरेबिया, कतार, मलेशिया, श्रीलंका, ओमान, सिंगापूर) लोकांनी हे 'रिंग ऑफ फायर' म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले.
सूर्यग्रहण पाहता न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदींनी ट्वीट केले आहे की, "इतर भारतीयांप्रमाणेच मीदेखील हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. परंतु, दुर्दैवाने मी हे सूर्यग्रहण पाहू शकलो नाही. कारण ढगांमुळे सूर्य झाकोळून गेला होता. त्यामुळे मी हे सूर्यग्रहण थेट पाहू शकलो नाही. मी कोझीकोडे आणि इतर भागातून दिसलेलं सूर्यग्रहण टीव्हीद्वारे लाईव्ह पाहिलं. आजच्या सूर्यग्रहणामुळे मी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोललो, त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे.
Like many Indians, I was enthusiastic about #solareclipse2019. Unfortunately, I could not see the Sun due to cloud cover but I did catch glimpses of the eclipse in Kozhikode and other parts on live stream. Also enriched my knowledge on the subject by interacting with experts. pic.twitter.com/EI1dcIWRIz
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2019
ग्रहण कसे पाहावे?
उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण कधीही पाहू नये. दुर्बिणी, साधे गॉगल्स, काळया काचा, एक्सरे फिल्मस, सीडी यातून ग्रहणे पाहू नयेत त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. ग्रहण बघण्यासाठी बनवलेला ग्रहण चष्मा किंवा पिन होल कॅमेरा यातूनच ग्रहण पहावे. सूर्याकडे जास्त वेळ आणि एकटक पाहू नये. काळी काच, काळा गॉगल, एक्स रे फिल्म, चंदेरी रंगाच्या अॅल्युमिनिअम फिल्मचे गॉगल यामध्ये सूर्याकडून येणारी हानिकारक अवरक्त व अतिनील प्रारणे शोषली जात नाहीत. ही सर्व साधने खूप स्वस्त असली व त्यातून सूर्य दिसत असला तरी त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रहण बघण्यासाठी बनवलेल्या सुरक्षित ग्रहण चष्म्यातूनच ग्रहण बघावे, असे आवाहन लातूर विज्ञान केंद्रातर्फे केले आहे.
पुढील सूर्यग्रहण कधी?
2027 आणि 2028 साली खंडग्रास, तर 2031 साली कंकणाकृती ग्रहण भारतातून दिसेल. त्यामुळे यावर्षी 26 डिसेंबरला दिसणाऱ्या ग्रहणाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. तसेच निसर्गातील विविध गोष्टी जसे झाडांची पाने, फुले, पशू, पक्षी यांच्या वर्तनात ग्रहण काळात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदवावे, त्यांची छायाचित्रे घ्यावीत.
ग्रहण म्हणजे काय? जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एकप्रकारचा लपंडाव होतो. सावलीमुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य पृथ्वीवरून काही काळासाठी दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे काही काळ चंद्र दिसत नाही त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात.
सूर्यग्रहण कुठल्या प्रकारचे असतात? ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणले जाते. ज्यावेळी चंद्रा मुळे सूर्य मध्यभागात गोलाकृती आकारात झाकला जातो त्यास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणले जाते. ज्यावेळी चंद्रा मुळे सूर्य अंशतः झाकला जातो त्यावेळी त्यास खंडग्रास सूर्यग्रहण म्हणले जाते.
यावेळेसचे ग्रहण कुठल्या प्रकारचे आहे? 26 डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती प्रकारचे आहे. परंतु ही कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील ठराविक भागातच दिसणार असून, भारताच्या उर्वरित भागात खंडग्रास पद्धतीचे ग्रहण पहायला मिळेल. दक्षिण भारतात जास्तीत जास्त तीन मिनिट चाळीस सेकंद एवढ्या कालावधीसाठी सूर्याचा सुमारे 97 टक्के भाग झाकला जाईल. तर लातूरमध्ये दीड मिनिटांसाठी जास्तीत जास्त सुमारे 75 टक्के भाग झाकला गेलेला दिसेल.
ग्रहण केव्हा होते? चंद्रग्रहण हे पौर्णिमेला तर सूर्यग्रहण हे नेहमीच अमावास्येला घडते. दर पौर्णिमा किंवा अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच प्रतालात नसतात त्यामुळे दर अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण घडत नाही.
ग्रहण अशुभ असते काय? प्राचीन काळी जेव्हा मनुष्याला खगोलशास्त्राविषयी विशेष ज्ञान नव्हते तेव्हा ग्रहणे का घडतात याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे चंद्र अथवा सूर्य अचानकपणे आकाशात दिसणे बंद झाल्याने लोक भयभीत होत असत. त्यामुळे ग्रहण म्हणजे आपल्यावर आलेले संकट अशी एक धारणा निर्माण झाली. त्यातूनच ग्रहण अशुभ किंवा अरिष्ट ही अंधश्रद्धा तयार झाली.
वास्तविक ग्रहणे हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार असून तो सर्वांनी आवश्यक ती काळजी घेऊन समाजातील सर्वच घटकांनी ( गर्भवती स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक) अनुभवला पाहिजे.
ग्रहणाची वेळ काय? लातूर शहरातील ग्रहणाच्या वेळा खालील प्रमाणे: सकाळी 8:०6 वाजता ग्रहण सुरू होईल ( स्पर्श) यात सूर्य झाकायला सुरुवात होईल. सकाळी 9:26 वाजता ग्रहणाची सर्वाधिक अवस्था दिसून येईल (मध्य). लातूरात साधारणपणे 75 टक्के सूर्य झाकलेला दिसेल. ही अवस्था सुमारे दीड मिनिट राहील. यानंतर झाकलेला सूर्य हळूहळू पूर्ववत दिसायला सुरुवात होईल. याला ग्रहण सुटणे असे म्हटले जाते. सकाळी 11.03 वाजता सूर्य पूर्णपणे दिसू लागेल ( मोक्ष).
या ग्रहणाचे वैशिष्ठ काय? दर वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणे अवकाशात घडून येऊ शकतात. त्यातील 4 ते 5 सूर्यग्रहण ग्रहणे तर 3 ते 4 चंद्रग्रहण ग्रहणे असतात. वर्षभरात किमान दोन वेळा तरी सूर्यग्रहण घडतेच. असे असले तरी सर्व ग्रहणे आपल्याला ( भारतातून) दिसतीलच असे नाही.
यावर्षी भारतातून दिसणारे हे शेवटचे ग्रहण असून, पुढच्याच वर्षी 21 जूनला आणखी एक कंकणाकृती ग्रहण भारतात दिसणार आहे. परंतु त्याकाळात मान्सूनमुळे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्यानंतर 2027 आणि 2028 साली खंडग्रास, तर 2031 साली कंकणाकृती ग्रहण भारतातून दिसेल. त्यामुळे यावर्षी 26 डिसेंबरला दिसणाऱ्या ग्रहणाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. तसेच निसर्गातील विविध गोष्टी जसे झाडांची पाने, फुले, पशू, पक्षी यांच्या वर्तनात ग्रहण काळात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदवावे, त्यांची छायाचित्रे घ्यावीत असे आवाहन लातूर विज्ञान केंद्रातर्फे केले आहे.