केरळसाठी केंद्राकडून 500 कोटींची मदत
केरळातील या पूरपरिस्थीतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाहणी केली. केरळला 500 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
कोची : महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजला आहे. केरळातील या पूरपरिस्थितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाहणी केली. केरळला 500 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. काल रात्रीच मोदी तिरुवअनंतपुरममध्ये दाखल झाले होते. आजही केरळमधील पूरपरिस्थिती कायम आहे. हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर केला आहे.
पुरातील मृतांचा आकडा 324 वर
दरम्यान केरळमधील भीषण पूरात 324 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. एकूण 82 हजार लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळही अद्याप बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु आहे.
पूरग्रस्तांना विविध राज्यातून मदत
महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत.
टेलिकॉम कंपन्यांकडून पुढील सात दिवस विनामूल्य सेवा
केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीला आता अनेक टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य देण्याचं ठरवलं आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.