PM Modi Rajya Sabha Speech: शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावं, चर्चेतून प्रश्न सोडवू : पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावं, पुढे जाण्यासाठी आपण एकत्र चर्चा करू. मी सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण देत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. वरच्या सभागृहातील चर्चा शुक्रवारी पूर्ण झाली. शेतकरी आंदोलनाबाबत देखील चर्चा झाली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून झालेल्या गदारोळामुळे खालच्या सभागृहात कोणतीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत आज सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील अभिभाषणावर होते.
शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचं आमंत्रण
कृषिमंत्री सतत शेतकऱ्यांशी बोलत असतात. आतापर्यंत कोणताही तणाव निर्माण झालेला नाही. एकमेकांच्या बोलण्याला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणार्यांना आम्ही विनंती करतो की आंदोलन करणे हा आपला हक्क आहे. पण वृद्ध लोक तिथे बसले आहेत, ते योग्य नाही. तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. तुम्ही आंदोलन संपवावं, पुढे जाण्यासाठी आपण एकत्र चर्चा करू. मी सभागृहाच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण देत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जे सांगितले होते त्याद्वारेच कृषी सुधारणा केली गेली आहे. प्रत्येक सरकारने कृषी सुधारणांसाठी पुढाकार घेतला आहे. आता सुधारणांविषयी विरोधकांनी यू टर्न घेतला आहे. आंदोलकांना समजावून सांगून देशाला पुढे घेऊन जावं लागेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
प्रत्येकजण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत आहेत, पण शेतकरी आंदोलन का करत आहेत हे कोणीही सांगितले नाही. शेतकरी आंदोलनाच्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा केली पाहिजे. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे. 86 टक्के शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. यापूर्वी अल्पभूधारक शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. या शेतकऱ्यांची जबाबदारी आपली नाही का? असंही मोदी यांनी म्हटलं.
आंदोलनजीवी जमातीला ओळखावं- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आपण काही शब्दांशी फार परिचित आहोत. श्रमजीवी... बुद्धिजीवी... या सर्व शब्दांशी परिचित आहेत. परंतु मला असे दिसते की आता या देशात नवीन जमातीचा जन्म झाला आहे आणि ते आहे आंदोलनजीवी. हे लोक वकीलांचं आंदोलन, विद्यार्थ्यांचं आंदोलन, कामगारांचं आंदोलन अशा सगळ्या ठिकाणी दिसतील. कधी पडद्यामागे, कधी पडद्यासमोर हो काम करतात. ही एक संपूर्ण टीम आहे. हे लोक आंदोलन केल्याशिवाय जगू शकत नाहीत. आपण अशा लोकांना ओळखले पाहिजे.