(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mann Ki Baat : पाणी संचयनासाठी 'कॅच द रेन' अभियान, पाणी जपून वापरण्याची जबाबदारी सामूहिक : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ सुरू करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींची ही या वर्षातली दुसरी आणि एकूण 74 वी मन की बात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे. त्यामुळे ती भेट जपून खर्च करण्याची जबाबदारीही सामूहिक आहे. ज्याप्रमाणे सामूहिक भेट आहे, त्याप्रमाणे ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे, - ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, माघ पौर्णिमेला संत रविदास जी यांची जयंती असते. आजही संत रविदास जींचे शब्द, त्यांचे ज्ञान, आपल्याला मार्गदर्शन करतात.
नाशिकच्या स्नेहील यांचा उल्लेख पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासियांनो, आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ ही आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित आहे. मोदी म्हणाले की, एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहीलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं आहे की, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे.