कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी पीएम केअर्स फंडमधून 80 टक्के निधी
जानेवारी ते मार्च या कालावधीत लसीकरणाच्या 82 टक्क्यांहून अधिक खर्च पीएम केअर फंड उचलत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पीएम-केअर फंडमधून 2200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील खर्चाच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त हा निधी आहे, अशी माहिती केंद्रीय सचिवांनी मंगळवारी दिली. कोरोना व्हायरस साथीच्या वेळी मार्च 2020 मध्ये आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पीएम केअर फंडची स्थापना करण्यात आली होती. यात लोक आणि कंपन्यांनी स्वेच्छेने हातभार लावला आहे. या फंडमध्ये किती रक्कम जमा झाली याबद्दलची माहिती अद्याप नाही. परंतु पंतप्रधान कार्यालयात या फंडाचे व्यवस्थापन करणारे म्हणतात की हा निधी साथीच्या आजाराने बाधित झालेल्या क्षेत्रांना मदत करत आहे.
चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी सादर करण्यात आला होता, त्यामुळे त्यामध्ये लसीकरणासाठी स्वतंत्र तरतूद नव्हती. अशा परिस्थितीत जानेवारी ते मार्च या कालावधीत लसीकरणाच्या 82 टक्क्यांहून अधिक खर्च पीएम केअर फंड उचलत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
केंद्रीय सचिव टीव्ही सोमनाथन म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार संपूर्णपणे उचलत आहे. हे पैसे पीएम केअर फंड आणि आरोग्य मंत्रालयाकडून येत आहेत. जानेवारी ते मार्च या लसीकरणासाठी सुमारे 2700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील एक भाग आरोग्य मंत्रालयाकडून येत आहे आणि त्यातील काही भाग पीएम केअर फंडकडून देण्यात आला आहे. तीन कोटी लोकांचं लसीकरण पहिल्या टप्प्यात होणार आहे.
पहिल्या टप्प्याच संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे. लसीकरणाच्या आकस्मिक खर्चासाठी आरोग्य मंत्रालयाला अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला आहे. लसीकरणाच्या तीन कोटी बॅचसाठी 480 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली आहे. उर्वरित 2220 कोटी रुपये पीएम-केअर फंडातून येतील, असं केंद्रीय सचिवांनी सांगितलं आहे.
Unlock Maharashtra | कोरोनाचा प्रभाव कमी, महाराष्ट्र पुन्हा सुरळीत