American Airlines : फ्लाइटमध्ये पुन्हा सहप्रवाशाच्या अंगावर लघवी, दिल्ली विमानतळावर संशयिताला अटक
American Airlines : न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने आपल्याच मित्रावर लघवी केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.
American Airlines : विमानात सहप्रवाशाच्या अंगावर लघवी करण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने आपल्याच मित्रावर लघवी केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेनंतर विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ही संपूर्ण घटना AA292 अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाईटबद्दल सांगितली जात आहे.
शुक्रवारी (3 मार्च) रात्री 9:16 वाजता न्यूयॉर्कहून उड्डाण घेतले आणि 14 तास 26 मिनिटांनी शनिवारी (4 मार्च) रात्री 10:12 वाजता दिल्लीच्या IGI विमानतळावर उतरले. आरोपी हा अमेरिकेतील एका विद्यापीठाचा विद्यार्थी असून त्याने मद्यधुंद अवस्थेत झोपेत लघवी केली होती. या प्रकारानंतर आपण हे जाणूनबुजून केले नाही. झोपेत लघवी बाहेर पडली आणि सहप्रवाशावर पडली, असे संशयिताचे मत आहे.
आरोपीने माफी मागितली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीताने याबद्दल माफी मागितली, त्यानंतर पीडित प्रवाशाने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. कारण यामुळे त्याचे करिअर खराब होऊ शकते. मात्र, विमान कंपनीने ते गांभीर्याने घेत आयजीआय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) कळवले. एटीसीने सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना सतर्क केले, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीला अमेरिकन एअरलाइन्समध्ये प्रवास करता येणार नाही
अमेरिकन एअरलाइन्सने आरोपीवर कडक कारवाई केली आहे. अमेरिकन एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, या व्यक्तीला भविष्यात अमेरिकन एअरलाईन्समध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्याचे परतीचे तिकीट देखील रद्द केले आहे.
या पूर्वीही अशा अनेक घटना
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि या वर्षी जानेवारी महिन्यात देखील अशा दोन-तीन घटना उघडकीस आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात शंकर मिश्रा या मद्यधुंद व्यक्तीने एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते नवी दिल्लीच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर सुमारे एक महिन्यानंतर मिश्रा याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. आता असेच आणखी एक प्रकरण समोर आल्यावर अमेरिकन एअरलाइन्सने ते गांभीर्याने घेतले.
26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत असताना शंकर मिश्रा याने एका महिला सहप्रवाशासोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शंकर मिश्रा याने प्रवासादरम्यान एका 70 वर्षीय महिला प्रवाशावर लघवी केली होती. याप्रकरणी डीजीसीएने कठोर पावले उचलत एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मिश्रा याच्यावर 30 दिवसांची विमान प्रवास बंदी घालण्यात आली होती.