Pakistan Killings of Sikhs : पाकिस्तानातील दोन शीख तरुणांच्या हत्येवर भारताकडून तीव्र आक्षेप, पाकिस्तानला दिला 'हा' सल्ला
Pakistan Killings of Sikhs : या प्रकरणावरून पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा चर्चेत आहे.
Pakistan Killings of Sikhs : पाकिस्तानातील पेशावरमध्ये दोन शीख तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्याचबरोबर या घटनेवर भारताकडून तीव्र आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला सल्ला
या हत्याकांडाच्या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, या घटनेबाबत भारतातील लोकांमध्ये आणि विशेषत: शीख समुदायामध्ये मोठी चिंता आहे. हे हल्ले गांभीर्याने घेऊन पाकिस्तान सरकारने त्यांची चौकशी करावी. मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. यासोबतच पाकिस्तानला अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली
हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडवून आणले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी सकाळी हा हल्ला केला, सलजीत सिंग (42) आणि रणजीत सिंग (38) यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. शीख समाजातील हे दोन्ही अल्पसंख्याक मसाल्यांचा व्यापार करत होते आणि त्यांची दुकाने पेशावरपासून 17 किमी अंतरावर असलेल्या सरबंदमधील बाता ताल बाजारात होती. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पाकिस्तानला सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून निषेध
तथापि, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना दोषींना तात्काळ अटक आणि शिक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या, विशेषत: विना मुस्लिम लोकांच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पावले उचलण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. शरीफ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. या ‘दहशतवादी कृत्या’मागे पाकिस्तानशी शत्रुत्व असल्याचे ते म्हणाले. शरीफ यांनी यावेळी देशाच्या शत्रूंचा नायनाट करण्याचा संकल्प केला .