OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन, 20 व्या मजल्यावरून पडल्याने रमेश अग्रवाल यांचा मृत्यू
Ritesh Agarwal Father Dies : OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे निधन झाले आहे.
मुंबई : प्रसिद्ध OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे निधन झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुग्राममधील एका उंच इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याच आठवड्यात रितेश अग्रवाल यांचा विवाह झाला आहे. त्यातच आता त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुरुग्राम पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. रितेश अग्रवाल यांनी वडिलांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
रितेश अग्रवाल यांनी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. 'माझे कुटुंब आणि मी जड अंत:करणाने कळवत आहोत की आमची ताकद, आमचे मार्गदर्शक, माझे वडील रमेश अग्रवाल यांचे निधन झाले आहे. ते उत्साहाने जीवन जगले आणि दररोज माझ्यासह अनेकांना प्रेरणा देत राहिले. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे शब्द आमच्या हृदयात खोलवर गुंजतील. असे रितेश यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मुलगा रितेश अग्रवाल, सून आणि त्यांची पत्नी घरात होते.
गुरुग्रामचे डीसीपी पूर्व वीरेंद्र विज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा गुरुग्राममधील सेक्टर 54 मधील डीएलएफच्या द क्रेस्टच्या 20 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. सीआरपीसी कलम 174 अन्वये या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. सेक्टर 53 च्या एसएचओच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वी रितेश अग्रवाल यांचा विवाह
तीन दिवसांपूर्वी म्हणजे 7 मार्च रोजी रितेश अग्रवाल यांचा गीतांशा सूदशी यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांनी ही दुःखद घटना घडली. रितेश अग्रवाल आणि गीतांशा यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सॉफ्टबँकचे अध्यक्ष मासायोशी सोन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
35 हून अधिक देशात ओयो
रितेश अग्रवाल हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांने 2013 मध्ये ओयो रूम्स सुरू केले. OYO रूम्स ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी हॉटेल चेन आहे. ही कंपनी 35 हून अधिक देशांतील 1.5 लाखाहून अधिक हॉटेल्ससोबत काम करत आहे. Oyo लोकांना सर्वोत्तम सुविधांसह परवडणाऱ्या किमतीत त्यांचे आवडते हॉटेल बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
महत्वाच्या बातम्या
जुनी पेन्शन आता लागू केल्यास काहीच फरक पडणार नाही; इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा, फडणवीसांचं आवाहन