(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Opposition Meeting: मिशन 2024 विरोधकांचं स्पेशल 26, बंगळुरुमधील बैठकीसाठी काँग्रेसकडून आणखी दोन पक्षांना निमंत्रण
Opposition Meeting : विरोधकांची पुढील बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बंगळुरुमध्ये होणार आहे. विरोधकांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काँग्रेसने आणखी दोन लहान पक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलं आहे.
Opposition Parties Meeting News : 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी महाआघाडीची स्थापना करण्याच्या दृष्टीने देशातील विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. याच प्रक्रियेचा भाग म्हणून विरोधकांची पुढील बैठक (Opposition Meeting) 17 आणि 18 जुलै रोजी बंगळुरुमध्ये (Bengaluru) होणार आहे. विरोधकांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने काँग्रेसने (Congress) आणखी दोन लहान पक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एक प्रादेशिक पक्षालाही बंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अपना दल (के) च्या प्रमुख कृष्णा पटेल या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. यासोबतच बंगळुरुमधील बैठकीसाठी निमंत्रित केलेल्या पक्षांची संख्या वाढून 26 झाली आहे. याआधी मागील महिन्यात 23 जून रोजी बिहारच्या पाटण्यात विरोधकांची बैठक झाली होती. ही बैठक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केली होती.
पहिल्या बैठकीत 30 हून अधिक नेत्यांची उपस्थिती
या बैठकीसाठी 16 विरोधी पक्षांना निमंत्रित केल होतं, त्यापैकी 15 पक्ष बैठकीत सहभागी झाले होते. राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी कौटुंबिक कार्यक्रमाच्या कारणामुळे बैठकीत सहभागी होऊ शकले नव्हते. या बैठकीत या राजकीय पक्षातील 30 हून अधिक नेत्यांनी निवडणुकीपासून रणनीतीवर चर्चा केली होती.
दुसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद काँग्रेसकडे
विरोधी पक्षांची दुसरी बैठक काँग्रेसच्या नेतृत्त्वात होत आहे. ही बैठक सुरुवातीला शिमलामध्ये होणार होती. परंतु खराब वातावरणामुळे बैठकीचं ठिकाण बदललं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 17 जुलै रोजी रात्री बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर 18 जुलै रोजी बैठक होईल. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही सहभागी होणार आहेत.
ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) देखील उपस्थित राहणार
या बैठकीत सर्व प्रमुख विरोधी पक्ष सामील होणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीला हजर राहणार की नाही याबाबत संभ्रम होता. पण आता त्या बैठकीत सहभागी होणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने टीएमसीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, ममता बॅनर्जी 17 जुलै रोजी विरोधी पक्षांसाठी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे त्यांना काही पथ्ये पाळावी लागणार आहे. त्यामुळे त्या थेट 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील.
हेही वाचा