Opposition Meeting : भाजपविरोधी पक्षांची पाटणात आज बैठक, देशातील बडे नेते उपस्थित राहणार; विरोधकांच्या घोषणेकडं देशाचं लक्ष
Opposition Meeting : पाटणा (Patan) इथं आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.
Opposition Meeting : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा (Patan) इथं आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधातले 15 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीसाठी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं हे सर्व विरोधी पक्ष आज पाटण्याच्या मंचावरुन काही घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आज होणाऱ्या या बैठकीची धुरा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांभाळली आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते पाटण्याला पोहोचले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांची मूठ बांधण्यासाठी या बैठकीकडे पाहिजे जात आहे. अलीकडेच नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न नितीश कुमार करत आहेत.
बैठकीत देशातील बडे नेते सहभागी होणार
या बैठकीला देशभरातले बडे नेते सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षांच्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय महासचिव डी राजा, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि दीपांकर भट्टाचार्य सामील होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीशकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काँग्रेसनं देखील यावेळी नरमाईचं धोरण स्वीकारलं असून छोट्या पक्षांशी सहकार्याची भूमिका घेतल्याचं सध्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अलीकडंच नव्या रणनीतीचं सुतोवाच केलं आहे. विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या विरोधात 450 जागांवर एकच संयुक्त उमेदवार दिला जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं.