Indian Army PC on Operation Sindoor : 'पुन्हा अशी कारवाई झाली तर...'; पत्रकार परिषद संपताच विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा पाकिस्तानला इशारा दिला
Indian Army PC on Operation Sindoor : पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गुप्तचर यंत्रणेने भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात असे संकेत दिले आहेत.

Indian Army PC on Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज (बुधवारी) भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. या ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती भारत सरकारने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनीही पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, आमच्या गुप्तचर यंत्रणेने भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. त्यांना थांबवणे आणि त्यांना तोंड देणं अत्यंत महत्वाचे मानले जात होते. आज सकाळी, तुम्हाला माहिती आहेच की, भारताने अशा सीमापार हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा आणि रोखण्याचा आपला अधिकार वापरला आहे. ऑपरेशन सिंदूरमधून दहशतवादाच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
यानंतर, पत्रकारांना संबोधित करताना, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, 6 ते 7 मे 2025 रोजी (बुधवारी) मध्यरात्री 1.05 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हे सुरू करण्यात आले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पुढे बोलताना सांगितले की, येथे दहशतवाद्यांच्या भरती आणि प्रशिक्षणाचे केंद्र होते. येथे अनेक दहशतवादी येत असत. या हल्ल्यात लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नव्हते आणि आतापर्यंत कोणत्याही नागरिकांच्या जीवितहानीची नोंद झालेली नाही. दरम्यान, पत्रकार परिषदेच्या शेवटी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला इशारा दिला आणि सांगितले की, आम्ही पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड देण्यास तयार आहोत. त्याचबरोबर जर भविष्यात पाकिस्तानने कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली, तर भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे असंही त्यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी ठणकावून सांगितलं आहे.
निष्पाप नागरिकांची काळजी घेण्यात आली
लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेबाबत माहिती देताना सांगितलं की, भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही, अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी टार्गेट असलेली आणि ती ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील दाखवले.
भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. सोफिया कुरेशी माहिती देताना म्हणाल्या, आम्ही पीओके आणि पाकिस्तानमधील एकूण 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांदरम्यान, आम्ही खात्री केली की फक्त दहशतवादी मारले जातील आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. आम्ही कोटली अब्बासमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं. या छावणीत सुमारे 1500 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानी पंजाबमधील बहावलपूर आणि महमूना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.























