Onion Price : कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा प्लॅन, 170 शहरात स्वस्त दरात कांद्याची विक्री
भारतात सध्या कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. देशातील विविध शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर 60 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, दुसरीकडे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं पावले उचलली आहेत.
Onion Price : भारतात सध्या कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. देशातील विविध शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर 60 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, दुसरीकडे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं पावले उचलली आहेत. सरकारनं आपला कांद्याचा बफर स्टॉक पुन्हा काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील 170 शहरे आणि 685 केंद्रांवरील स्टॉल्सवरुन 25 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री सुरु केली आहे.
कांद्याच्या वाढत्या किंमती पाहता सरकारने बफर स्टॉक बाहेर काढणे, कांदा आयात करणे अशा उपाययोजना केल्या आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील प्रमुख केंद्रांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचे वितरण सुरु आहे. किरकोळ ग्राहकांना NCCF आणि NAFED द्वारे चालवल्या जाणाऱ्या मोबाईल व्हॅनद्वारे 25 रुपये प्रति किलो सवलतीच्या दराने कांदा मिळत आहे.
स्वस्त कांदा कुठे आणि किती केंद्रांवर उपलब्ध?
आधीच खरेदी केलेल्या 5 लाख टन कांद्याव्यतिरिक्त, केंद्राने अलीकडेच बफरसाठी अतिरिक्त 2 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील 71 ठिकाणी, जयपूरमध्ये 22, लुधियानामध्ये 12, वाराणसीमध्ये 10, रोहतकमध्ये 6 आणि श्रीनगरमध्ये 5 अशा विविध ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे स्वस्त दरात कांदा उपलब्ध आहे. भोपाळ, इंदूर, भुवनेश्वर, हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे स्वस्त दरात कांद्याची विक्री केली जात आहे.
दिल्लीत सर्वात जास्त किंमत
देशातील प्रमुख पुरवठादार असलेल्या महाराष्ट्रात घाऊक किंमतीत घसरण झाली आहे. निर्यात निर्बंधांनंतर राष्ट्रीय राजधानीत कांदा महाग झाला आहे. दिल्लीत कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 78 रुपये प्रति किलो आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सरासरी किरकोळ कांद्याचे दर प्रति किलो 3.40 रुपयांनी वाढून 53.75 रुपये प्रति किलो झाले आहेत.
5 दिवसात कांद्याच्या दरात दुप्पट वाढ
25 ऑक्टोबरपासून दिल्लीत कांद्याचे दर 40 रुपये किलो असताना वाढू लागले. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी ते दुप्पट होऊन 80 रुपये प्रति किलो झाले. 30 ऑक्टोबर रोजी किमती 78 रुपये प्रति किलोपर्यंत गेले आहेत.सध्या दिल्लीत कांद्याच्या सरासरी किरकोळ किंमती इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. गोवा आणि पुद्दुचेरीमध्ये किमतींमध्ये दुसरी सर्वाधिक वाढ झाली आहे, जिथे मंगळवारी सरासरी किरकोळ किंमत 72 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. इतर राज्यांमध्ये किरकोळ किमती 41 रुपये ते 69 रुपये प्रति किलोपर्यंत होत्या.