(Source: ECI/ABP News/ABP Majha)
14 November In History : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती, बालदिन
On This Day In History : 14 नोव्हेंबर ही तारीख स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. त्यांची जयंती ही बालदिन म्हणूनही साजरी केली जाते.
On This Day In History : 14 नोव्हेंबर ही तारीख स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. त्यांची जयंती ही बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (आता याचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे) येथे जन्मलेल्या नेहरुंना लहान मुलं फार आवडायची. 1964 पूर्वी भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात होता, परंतु जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा वाढदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. काही देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करतात.
1907: हिंदी भाषेचे प्रसिद्ध भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांची जयंती
हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतील कवी होते, असे मानले जाते की त्यांच्या कवितांनी भारतीय साहित्य बदलले होते. त्यांची शैली पूर्वीच्या कवींपेक्षा वेगळी होती. म्हणूनच त्यांना नव्या शतकाचा लेखक म्हटले जात होते. त्यांच्या कलाकृतींनी भारताच्या कवितेत एक नवीन प्रवाह निर्माण केला. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी अलाहाबादजवळील प्रतापगड जिल्ह्यातील बाबूपट्टी या छोट्याशा गावात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांचे पुत्र आहेत. मधुशाला हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. 18 जानेवारी 2003 रोजी त्यांचं निधन झालं.
1919: स्वातंत्र्यसैनिक लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांची जयंती
अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक, संपादक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अनंत काशिनाथ भालेराव यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. याबद्दल सक्तमजुरीच्या आणि तुरुंगावासाच्या शिक्षाही त्यांनी भोगली. स्वातंत्र्योत्तर काळात औरंगाबादहून प्रसिद्ध होत असलेल्या दैनिक मराठवाडातून त्यांनी सातत्याने समाजहिताची, विकासाची भूमिका घेत लेखन केले. विकासासाठी जनतेने केलेल्या आंदोलनांत आणि पत्रकार आणि साहित्यिकांची एक पिढी घडवण्यात भालेराव यांनी महत्वाची भूमिका बजावली.
1922: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन कंपनीने युनायटेड किंग्डममध्ये रेडिओ सेवेची केली सुरूवात
बीबीसी हे जगातील सर्वात मोठे ब्रॉडकास्टर्स आहे. 18 ऑक्टोबर 1922 रोजी लंडनमध्ये याची औपचारिक स्थापना झाली. 14 नोव्हेंबर 1922 रोजी बीबीसीने आपली पहिली रेडिओ सेवा सुरू केली होती.
2000: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांची पुण्यतिथी
योगेश्वर अभ्यंकर हे प्रसिद्ध गीतकार होते. त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1929 रोजी झाला.’शाळा सुटली पाटी फुटली, अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले’ यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली. सर्जनशील कवी म्हणून त्यांची ओळख होती. योगेश्वर अभ्यंकर यांचे 14 नोव्हेंबर 2000 रोजी निधन झाले.
2013: सचिन तेंडुलकरने खेळला शेवटचा कसोटी सामना
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (200 वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.