National Logistics Policy : PM मोदींच्या वाढदिवशी देशाला मिळाली राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉलिसीची भेट
National Logistics Policy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण (एनएलपी) चे उद्घाटन केले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशाला आज राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉलिसीची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण (एनएलपी) चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी "राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसी सुरु होणे हे भारताचा विकसित देश बनण्याचा ‘प्रण’ पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
"शेवटच्या टोकापर्यंत मालाचे जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी, वाहतुकीशी संबंधित आव्हाने संपवण्यासाठी, उत्पादकांचा वेळ आणि पैशाची बचत करण्यासाठी, कृषी मालाची नासधूस रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांचा आविष्कार म्हणजे आजचे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आहे. त्यामुळे होणारी समन्वयातील सुधारणा या क्षेत्राला अपेक्षित गती देईल, अशा भावाना यावेळी पंतप्रधा मोदी यांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेल्या भारतामध्ये परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. मेक इन इंडिया आणि भारत आत्मनिर्भर बनत असल्याचा स्वर जगात घुमत आहे. भारत मोठ्या प्रमाणातील निर्यातीचे उद्दिष्ट ठेवत असून ते पूर्ण देखील करत आहे. भारत एक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत असल्याची कल्पना जगाच्या मनात स्थिरावत आहे. आपण जर पीएलआय योजनेचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की जगाने ही कल्पना स्वीकारली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण सर्व क्षेत्रांमध्ये नवी ऊर्जा आणेल.
"धोरण ही एक सुरुवात आहे, धोरण आणि कामगिरीचा एकत्रित परिणाम म्हणजे विकास आहे. जेव्हा कामगिरीसाठीचे मापदंड, पथदर्शक आराखडा आणि वेळ निर्धारण एकत्र येतात, तेव्हा धोरण आणि कामगिरीचा एकत्रित परिणाम म्हणून विकास उदयाला येतो. आजचा भारत कुठलेही धोरण बनवण्यापूर्वी त्याचे कार्यक्षेत्र तयार करतो, तेव्हाच धोरण यशस्वीपणे राबवता येते. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण अचानक उदयाला आले नसून त्यामागे 8 वर्षांचे कठोर परिश्रम आहेत. या ठिकाणी धोरणात्मक बदल आहेत, मोठे निर्णय आहेत आणि मी माझ्या बद्दल बोलायचे झाल्यास यामागे माझा 22 वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
"सागरमाला, भारतमाला यासारख्या योजनांनी पायाभूत सुविधांच्या योजनाबद्ध विकासासाठी लॉजिस्टिक संपर्क यंत्रणा सुधारण्यासाठी समर्पित माल वाहतूक क्षेत्राच्या कामाला गती दिल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारतीय बंदरांच्या एकूण क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाली असून मालवाहू जहाजांचा मालाची चढ किंवा उतार करून माघारी येण्याचा सरासरी वेळ 44 तासांवरून 26 तासांवर आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. निर्यातीला चालना देण्यासाठी 40 कार्गो टर्मिनल बांधण्यात आली आहेत. 30 विमानतळांना शीत-गृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. देशात 35 मल्टीमोडल केंद्रे तयार होत आहेत. “जल मार्गाद्वारे आपण पर्यावरण पूरक आणि कमी खर्चाची वाहतूक करू शकतो, यासाठी देशात अनेक नवे जल मार्ग देखील बांधले जात आहेत. कोरोना काळातील किसान रेल आणि किसान उडान प्रयोगांचा देखील त्यांनी उल्लेख केला.