Omicron : कोरोनाविरुद्ध (Coronavirus) चालू असलेल्या लढाईदरम्यान DGCIने आता आपत्कालीन वापरासाठी आणखी दोन लसींना मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या दोन लसींची नावे आहेत - कोरबेवॅक्स ( CORBEVAX) आणि कोवोवॅक्स (COVOVAX). CORBEVAX आणि COVOVAX व्यतिरिक्त, विषाणूविरोधी औषध मोलनुपिराविर (Anti-Viral drug Molnupiravir) ला देखील मान्यता देण्यात आली आहे. मोलनुपिरावीर हे विषाणूविरोधी औषध आहे, या औषधाचे उत्पादन आता देशातील 13 कंपन्या करणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रौढ कोविड रूग्णांच्या उपचारात या औषधाचा वापर केला जाईल.


कोरबेवॅक्स (CORBEVAX) लस ही भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. ही लस हैदराबाद स्थित फर्म बायोलॉजिकल-ई (Biological-E) ने कोरोनाचा सामना करण्यासाठी बनवली आहे. ही आता भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल लस कोवोवॅक्स (COVOVAX) लसचे उत्पादन पुण्याचे सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.






 


भारतात यापूर्वी, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविड-19 लस 'कोव्होव्हॅक्स' (COVOVAX) ला काही अटींसह आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी ऑक्टोबरमध्ये ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज सादर केला आणि आपत्कालीन परिस्थितीत कोवोव्हॅक्सच्या मर्यादित वापरास परवानगी देण्याची विनंती केली होती.


तज्ज्ञ समितीने 27 नोव्हेंबर रोजी एसआयआय (SII) च्या अर्जाचे मूल्यांकन केले आणि त्यावर विचारविनिमय केल्यानंतर लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली. 


दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha