दिल्ली : कोरोना (Coronavirus) महामारीमुळे आणि त्यानंतरच्या शिक्षणात (Education) आलेल्या व्यत्ययांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष वाढला आहे. विद्यार्थ्यांचा हा संघर्ष कमी करण्यासाठी तसेच सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांवरील ओझे (School Bag) कमी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके करण्याचे ठरवले आहे. ही नवी अभ्यासक्रमाची पुस्तके मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच नवे शैक्षणिक वर्ष 2022 सुरु होण्याआधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे NCERT ने सांगितले आहे.

Continues below advertisement


सततच्या शैक्षणिक व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर, NCERT ने पुढील वर्षासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सर्व टप्प्यांवर तर्कसंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) बाहेर येण्यास वेळ लागू शकतो. अंतर्गत आणि बाह्य तज्ज्ञांचा समावेश असलेले विभाग मंगळवारी तर्कसंगत अभ्यासक्रम सादर करणार आहेत, ज्याच्या आधारे नवीन पाठ्यपुस्तकांची रचना केली जाणार आहे.


NCERT संचालक श्रीधर श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण केल्यानंतर, सर्व सामग्री विभागांनी "28 डिसेंबर 2021 पर्यंत तर्कसंगत करण्यासाठी प्रस्तावित अभ्यासक्रमाचे विश्लेषण अभ्यासक्रम आणि विकास विभागाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. संचालकांनी असेही नमूद केले की 1 जानेवारी 2022 पर्यंत, प्रस्तावित बदलांसह पाठ्यपुस्तके पुन:र्मुद्रणासाठी प्रकाशन विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र शिक्षण विभागाने केले पुस्तकांचे ओझे कमी


महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022-2023 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे पहिल्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय - इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिका प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha