शेतकऱ्याची अफलातून आयडिया! बांबू, प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीनं बनवला रहाट अन् पाईपलाईन!
ओडिशातील शेतकऱ्यानं असाच एक भन्नाट आणि अफलातून शोध लावला आहे. नदीपासून आपल्या शेतापर्यंत 2 किलोमीटर दूर पाण्याची सोय करण्यासाठी या शेतकऱ्यानं बांबू, लाकूड, प्लास्टिकच्या मदतीनं रहाट बनवला आहे.
ओडिशा : गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. अनेकदा अशा गरजेतून भन्नाट शोध लागल्याची उदाहरणं आहेत. ओडिशातील शेतकऱ्यानं असाच एक भन्नाट आणि अफलातून शोध लावला आहे. नदीपासून आपल्या शेतापर्यंत 2 किलोमीटर दूर पाण्याची सोय करण्यासाठी या शेतकऱ्यानं बांबू, लाकूड, प्लास्टिकच्या मदतीनं रहाट बनवला आहे सोबतच बांबूंचीच पाईपलाईन देखील बनवली आहे. महुर टिपिरिया असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
माहितीनुसार महुर यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना वेळोवेळी विनंती केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनीच बांबू, लाकडं, प्लॅस्टिक बाटल्या वापरुन असा मोठा रहाट तयार केला. त्यांच्या या प्रयोगामुळं आसपासच्या शेतकऱ्यांचीही गरज भागली आहे. या शेतकऱ्याचा हा प्रयोग पाहण्यासाठी आता आसपासच्या जिल्ह्यातील लोकं गर्दी करु लागले आहेत.
महुर यांच्या शेतापर्यंत पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यांनी यासाठी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली, मात्र त्यांच्या हाकेला कुणीही प्रतिसाद दिला नाही. मग त्यांनी कुठलीही तक्रार न करता अफलातून अशा देशी पद्धतीचा शोध लावत आपल्या शेतासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील महुर टिपिरिया यांची या प्रयोगानंतर प्रचंड चर्चा होत आहे.
असा केला प्रयोग महुर यांनी हा रहाट बनवताना बांबू आणि लाकडाचा वापर केला आहे. त्याच्या मदतीनं एक मोठं गोल चाक तयार केलं आहे. जे पवनचक्कीप्रमाणं पाणी आणि हवेच्या सहाय्याने फिरत राहातं. त्या मोठ्या चाकाला त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या विशिष्ट पद्धतीनं कापून लावल्या आहेत. हा पूर्ण सेटअप त्यांनी नदीत लावला आहे. ज्यावेळी हे चाक फिरतं त्यावेळी कापलेल्या बाटलीत नदीतलं वाहत पाणी भरलं जातं. 30 ते 40 बाटल्या या चाकाला बांधल्या आहेत. या बाटल्यातील पाणी चाकांच्या वर बांधलेल्या एका छोट्या डबक्यात भरलं जातं तिथून ते पाणी बांबूंच्या पाईपलाईनमध्ये उतरत शेतापर्यंत पोहोचतं.
#WATCH | Odisha: Farmer in Mayurbhanj sets up waterwheel instrument near river to irrigate his farmland situated 2-km away. "I'm a poor man. I repeatedly urged officers to make arrangements for irrigation but to no avail. Finally, I made this," said Mahur Tipiria (09.01) pic.twitter.com/STFzxzuuKT
— ANI (@ANI) January 10, 2021