(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताचं 'सिक्रेट' पाऊल; अजित डोभाल रशिया दौरा करणार
Ajit Doval: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतंच युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेबाबत वक्तव्य केलं होतं. यासाठी चीन, भारत आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात.
NSA Ajit Doval To Visit Russia : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांच्यावर रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची 'सिक्रेट' जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळत आहे. रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्याच्या दृष्टीनं या आठवड्यात अजित डोभाल रशिया दौरा करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात रशिया (Russia) आणि युक्रेनचा (Ukraine) दौरा करून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशी युद्ध थांबवण्यावर चर्चा केली होती. तेव्हापासूनच जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. अशातच आता अजित डोभाल आपल्या 'सिक्रेट' रणनीतीनं युद्ध थांबवण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतंच युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेबाबत वक्तव्य केलं होतं. यासाठी चीन, भारत आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. पुतीन यांच्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं म्हटलं होतं. अशातच आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल रशिया दौऱ्यावर गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर मोदींकडून 'सिक्रेट' जबाबदारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल पुढील आठवड्यात रशियाला भेट देणार आहेत. जिथे ते ऑक्टोबरमध्ये कझान येथे होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी BRICS NSA बैठकीत सहभागी होतील. मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान डोभाल रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी चर्चा करू शकतात. या भेटीदरम्यान ते त्यांच्या चिनी समकक्षासोबत स्वतंत्र बैठक घेण्याचीही शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोन संभाषणात चर्चा झाली होती की, त्यांच्या भेटीनंतर पंतप्रधान शांततेशी संबंधित कल्पनांवर चर्चा करण्यासाठी त्यांचे NSA रशियाला पाठवतील. मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात डोभाल आपल्या रशियन समकक्ष आणि ब्रिक्सच्या इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींना भेटतील. यामध्ये जुलैमध्ये मॉस्को शिखर परिषदेत झालेल्या चर्चेच्या आधारे पुढील रणनीती ठरवता येईल. त्याचप्रमाणे, नवे पाच सदस्य देश - सौदी अरेबिया, यूएई, इराण, इजिप्त आणि इथिओपिया या गटात सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच ही BRICS NSA बैठक पार पडणार आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणालेले?
रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरू आहे. अनेक देशांनी संघर्ष संपवण्याचं आवाहन केलं आहे. दोन दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन यांनीही या प्रदेशात सुरू असलेल्या संकटावर तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी कबुली दिली होती. इस्तंबूल चर्चेदरम्यान ज्या करारांवर सहमती झाली आणि ज्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही ते भविष्यातील शांतता चर्चेचा आधार बनू शकतात, यावर पुतिन यांनी भर दिला. पुतिन यांनी भारतासह युक्रेन संघर्षावर त्यांच्या संपर्कात असलेल्या तीन देशांची नावं दिली आणि ते संकट सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं देखील सांगितलं.
पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया-युक्रेनच्या दौऱ्याच्या काही दिवसांनी व्लादिमीर पुतिन यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या भेटीदरम्यान 'संघर्षाच्या लवकर, चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरणासाठी भारताची दृढ वचनबद्धता' यावर जोर दिला होता. युक्रेनला पाठिंबा देण्यापासून कधीही मागे हटू नका, असंही ते म्हणाले होते. युक्रेनला पाठिंबा देण्याचा निर्णय केवळ नैतिकदृष्ट्या योग नाही, तर राष्ट्रीय हिताचाही आहे, असं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं.