FasTag झालं जुनं, आता टोल वसुली वर्च्युअली होणार; नव्या सॅटेलाइट प्रणालीद्वारे Toll Tax कापणार
New Toll Collection System: आता केंद्र सरकार फास्टटॅगसोबतच नवी टोल संकलन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. ही प्रणाली पूर्णतः वर्च्युअल असेल, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली आहे.
Govt To Implement GNSS Based Toll Collection System: नवी दिल्ली : चारचाकी वाहानांनी प्रवास करताना टोल भरण्यासाठी फास्टटॅग (FasTag) असणं अनिवार्य आहे. गाडीच्या काचेवर लावलेलं फास्टटॅग स्कॅनकरुन आपोआप त्यातून टोलची रक्कम वळती करुन घेतली जाते. पण, आता सरकार आणखी एक पाऊल टाकत टोल वसुलीसाठी नवी सिस्टिम आणण्याचा विचार करत आहे. खुद्द रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली. सरकार निवडक राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आणि यासोबतच एस आणि जीएनएसएस (GNSS) आधारित टोल संकलन प्रणाली लागू करेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी राज्यसभेत बोलताना दिली आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, सरकार निवडक राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग तसेच एस आणि जीएनएसएस आधारित टोल संकलन प्रणाली लागू करेल. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितलं की, ही नवीन प्रणाली कर्नाटकातील NH-275 च्या बंगळुरू-म्हैसूर महामार्गावर आणि हरियाणातील NH-709 च्या पानिपत-हिसार मार्गावर सुरुवातीच्या टप्प्यांतील चाचणीसाठी लागू करण्यात आली आहे.
FasTag पेक्षाही सॅटेलाईट सेवा जलद
नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, सध्याच्या FASTag सुविधेव्यतिरिक्त, केंद्र सरकारनं प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय महामार्गाच्या निवडक भागांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम (GNSS) आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. टोलनाक्यांवर लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशानं फास्टॅग सेवा सुरू करण्यात आली होती आणि आता या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल उचलण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्ही यासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, नवी प्रणाली (सॅटेलाईटवर आधारित टोल प्रणाली) फास्टॅगपेक्षा वेगवान आहे.
आता टोलनाके होणार वर्च्युअल
नव्या सॅटेलाईटवर आधारित टोल टॅक्स सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं अत्यंत सोपं आणि सोयीचं होणार आहे. आता जसं टोलनाक्यांवर थांबावं लागलं, अनेकदा हा वेळ काही मिनिटांहून अधिक असतो. त्यामुळे त्या भागांत ट्रॅफिकही वाढतं, पण नवी प्रणाली सुरू झाल्यानंतर टोल नाक्यांवर अजिबात थांबण्याची गरज भासणार नाही. गाडी सुरू असतानाच तुमच्याकडून हा टोल वसुल केला जाणार आहे. सध्या कर संकलनासाठी टोल प्लाझावर लागू करण्यात आलेली FasTag प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅगवर कार्य करते, जी स्वयंचलितपणे टोल वसूल करते. पण, GNSS आधारित टोल प्रणाली वर्च्युअल पद्धतीनं टोल वसुल केला जाईल. याचाच अर्थ असा की, तुम्हाला टोल कुठे आहेत? हे पाहता येणार नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी थांबावंही लागणार नाही.
GNSS प्रणाली कसं काम करेल?
टोल संकलनासाठी उपग्रह प्रणालीमध्ये व्हर्च्युअल गॅन्ट्रीज इंस्टॉल केल्या जातील, जी GNSS इनेबल वाहनांशी जोडल्या जातील आणि या वर्च्युअल टोलमधून कार गेल्यावर, निश्चित रक्कम युजर्सच्या खात्यातून कापली जाईल. अशा सेवा जगातील अनेक देशांमध्ये पुरविल्या जात आहेत, यामध्ये जर्मनी आणि रशियाचा समावेश आहे. त्यामुळे फास्टॅगच्या माध्यमातून वाहनचालकांना टोल भरण्यासाठी टोल नाक्यांवर जो वेळ खर्च करावा लागत आहे, त्यातून दिलासा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
NH प्रोजेक्ट्सना उशीर का होतोय?
टोल वसुलीसाठी लागू करण्यात येणाऱ्या नव्या प्रणालीबाबत बोलताना केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, साधारणतः 10 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सर्व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांपैकी 697 प्रकल्प त्यांच्या नियोजित वेळेपासून उशिरानं सुरू आहेत. विलंबाची कारणं स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची सर्वात मोठी कारणं म्हणजे, भूसंपादन, वैधानिक मान्यता, अतिक्रमण हटवणं, कायदा आणि सुव्यवस्था, कंत्राटदाराच्या आर्थिक समस्या तसेच कोविड-19, पाऊस- यांसारख्या साथीचे रोग. पूर ते चक्रीवादळ आणि भूस्खलनापर्यंतच्या अनपेक्षित घटना आहेत.