Noida Facebook Live: सोशल मीडियावर LIVE करत जीवन संपवण्याचा प्रयत्न, फेसबुकच्या एका फोनमुळे नोएडातील तरुणाचा वाचला जीव
Noida Facebook Live: दिल्लीतील एका तरुणाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक व्हिडिओ अपलोड केला होता. आणि व्हिडिओची माहिती थेट अमेरिकेच्या फेसबुक कार्यालयाने भारताला दिली.
Noida Facebook Live: हल्ली सोशल मिडियावर प्रसिध्दीसाठी अनेक प्रयोग केले जातात. सोशल मिडियावर प्रसिद्ध होऊन बऱ्याच लोकांना उत्पन्नाचे साधन देखील उपलब्ध झाले आहे. सोशल मीडियावरुन लगेच प्रसिध्दी मिळके असा समज सध्या समाजातील तरुणांमध्ये आहे. पण सोशल मिडियावर प्रसिध्दीसाठी केलेल्या काही गोष्टी महागात देखील पडू शकतात हे देखील तितकेच खरे आहे. अशीच एक गोष्ट नोएडातील (Noida) विद्यार्थ्याला महागात पडली आहे. आत्महत्येचा खोटा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ या तरुणाने प्रसिध्दीसाठी सोशल मीडियावर टाकला आणि अमेरिकेपासून ते नोएडापर्यंत सर्वांना कामाला लावले. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ अमेरिकेतील(America) फेसबुक(Facebook) मुख्यालयात पाहण्यात आला आणि तात्काळ भारतात त्याची माहिती देण्यात आली.
नोएडातील या विद्यार्थ्याने मंगळवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक व्हिडिओ अपलोड केला. पण हा काही साधा व्हिडीओ नव्हता. यात तो तरुण डास मारण्याचे औषध पित आत्महत्येचा प्रयत्न करत होता. या व्हिडीओची माहिती अमेरिकेच्या फेसबुक मुख्यालयाने तात्काळ भारत सरकारला दिली. त्यानंतर ती माहिती उत्तर प्रदेशच्या सरकारला देण्यात आली आणि नंतर ती माहिती नोएडा पोलिसांकडे गेली. पोलिसांना जशी ही माहिती मिळाली तेव्हा पोलिस खात्यात एकच गोंधळ उडाला.
विद्यार्थ्यापर्यंत पोलीसदल पोहचले..
पोलीसांच्या पथकाने लवकरात लवकर विद्यार्थ्याचे लोकेशन शोधून काढून त्याच्यापर्यंत पोहचले. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लगेचच त्याच्यावर उपचार देखील करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्याकडून माफीनामा लिहून घेऊन त्याला सोडून दिले. हा विद्यार्थी त्याच्या आई वडिलांसोबत राहत असून सध्या तो दहावी इयत्तेत शिकत आहे.
प्रसिध्द होण्यासाठी केलेला अभिनय पडला महागात..
पोलीस स्थानकाचे अधिकारी विंध्याचल तिवारी यांनी सांगितले की, हा विद्यार्थी फेसबुकवर प्रसिध्दी मिळण्यासाठी यासारखे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतो. मंगळवारी रात्री देखील त्याने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यात त्याने डास मारण्याचे औषध पित असल्याचा अभिनय केला होता. त्या डासाच्या औषधाच्या जागी त्यात त्याने पाणी भरले होते आणि ते पाणी डासाचे औषध म्हणून पिण्याचा अभिनय केला होता. हा व्हिडिओ अमेरिकेतील फेसबुक मुख्यालयात पाहिला गेला आणि त्यांनी याची माहिती भारत सरकारला दिली.
विद्यार्थ्याचे केले कांउन्सलिंग...
या विद्यार्थ्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला. परंतु त्याच्याकडून हे सगळं प्रसिध्दीसाठी करण्यात आलं होतं हे देखील समोर आलं. त्यानंतर त्याचे कांउन्सलिंग देखील करण्यात आले.