Nitish Kumar : विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला
Bihar Vidhansabha Flore Test : नितीश कुमार यांच्या बाजूने 129 मतं पडली तर विरोधकांनी वॉक आऊट केल्याने त्यांच्या बाजूने मतदान झालं नाही.
Bihar Vidhansabha Floor Test : बिहारमध्ये गेल्या महिनाभरात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. नितीश कुमार यांच्याबाजूने 129 मतं पडली. तर विरोधकांनी वॉक आऊट केल्याने त्यांच्या बाजूने मतदान झालं नाही. बिहारमध्ये 243 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 122 आमदारांचे संख्याबळ आवश्यक होतं.
Bihar CM Nitish Kumar's government wins Floor test after 129 MLAs support him. pic.twitter.com/0pclQRL2Vz
— ANI (@ANI) February 12, 2024
विरोधकांनी वॉक आऊट करण्यापूर्वी त्यांनी मतदानात भाग घ्यावा अशी विनंती नितीश कुमार यांनी विरोधकांना केली. त्यामुळे कुणाकडे किती आमदार आहेत हे सर्वांना समजेल असंही ते म्हणाले. सध्याच्या घडीला काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांकडे मिळून 114 आमदारांचे पाठबळ आहे.
विश्वासदर्शक मतदानाचा निकाल हा राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वास्तविक आनंद मोहन यांचा मुलगा आणि आरजेडी आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव मतदानापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या गटात गेले. त्यातून नितीशकुमार सहज बहुमत मिळवतील हे स्पष्ट झाले.
बिहारमध्ये एनडीएचे 128 आमदार होते. एक आमदार दिलीप राय विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर राजदच्या तीन आमदारांच्या पाठिंब्याची भर पडल्याने त्यांच्या बाजूने मतदान करणाऱ्यांची संख्या 129 झाली.
मतदानापूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारबाबत सर्व प्रकारचे अटकळ बांधले जात होते.
सत्ताधारी नाराज आमदारही विधानसभेत पोहोचले
मतदानापूर्वी जेडीयू आणि भाजपचे नाराज आमदारही आपली भूमिका बदलून विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचले.विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपचे तीन आमदार रश्मी वर्मा, भागीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव आले. त्यानंतर जेडीयूच्या आमदार विमा भारतीही विधानसभेत पोहोचल्या. चारही नेत्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केले.
विधानसभा अध्यक्षांना हटवलं
विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटवण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता. एनडीएने सभापतींविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला 243 सदस्यीय विधानसभेत 125 आमदारांचा पाठिंबा मिळाला, तर 112 सदस्यांनी विरोधात मतदान केले.
बिहार विधानसभेचं गणित
विधानसभेत भाजपचे 78 जेडीयूचे 45,जीतन राम मांझी यांच्या एचएएमचे चार आणि एक अपक्ष आमदार आहेत. त्यांची एकूण संख्या 128 आहे. विरोधी गटात राजदचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या आघाडीचे 16 आमदार आहेत. एक आमदार AIMI चा आहे. त्यांची एकूण संख्या 115 आहे. आरजेडीच्या तीन आमदारांनी बाजू बदलल्याने त्यांची संख्या 112 झाली आहे.
ही बातमी वाचा: