Delhi Blast : हा साधासुधा नाहीतर शक्तिशाली स्फोट, घटनेची चौकशी सुरु, दिल्ली पोलिस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया समोर
देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसरात एका कारमध्ये स्फोट (New Delhi Bomb Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. , या घटनेबाबत दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
New Delhi Bomb Blast : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसरात एका कारमध्ये स्फोट (New Delhi Bomb Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्याकाळी 6 वाजून 52 मिनीटांच्या आसपास ही घटना घडली आहे. यामध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून आठ मृतदेह एलएनजेपी रुग्णालयात आणण्यात आले. ज्यावेळी स्फोट झाला ती वेळ गर्दीची असते. स्फोटाचे नेमके ठिकाण लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट 1 जवळ आहे. दरम्यान, या घटनेबाबत दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची बारकाईने चौकशी केली जात आहे. हा साधासुधा स्फोट नसल्याची माहिती दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी
स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, कार क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी जळून खाक झाली. यामुळं जवळच्या सात ते आठ वाहनांना आग लागली आहे. स्फोटानंतर, दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेचा तपास सुरु केला आहे. हा स्फोट कारमधील सीएनजीमुळं झाला की स्फोटकांच्या वापरामुळं झाला हे सध्या स्पष्ट झालेलं नाही.
परिस्थितीवर लक्ष
स्फोटाची पहिली प्रतिक्रिया दिल्ली पोलिस आयुक्तांकडून आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी स्फोटाबाबत म्हटले की, या स्फोटाची चौकशी केली जात आहे. हा सामान्य स्फोट नाही. आज संध्याकाळी 6 वाजून 52 मिनीटांच्या सुमारास एक कार हळूहळू जात होती आणि लाल दिव्यावर थांबली. त्या कारमध्ये स्फोट झाला आणि स्फोटामुळे जवळच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. एफएसएल आणि एनआयएसह सर्व एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी तपासही सुरु केला आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी झाले आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गृहमंत्र्यांनीही आम्हाला फोन केला आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्यासोबत माहिती शेअर करत असल्याची माहिती ल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली गुप्तचर खात्याच्या प्रमुखांशी चर्चा
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुप्तचर खात्याच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आणि या स्फोटाची माहिती घेतली. घटनास्थळी एनएसजीचे अधिकारीही उपस्थित आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहोचली असून त्यांनी पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
























