Supriya Sule : 'या सरकारने 9 वर्षात 9 सरकारं पाडली',खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात
Supriya Sule In Parliament : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत अनेक मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
Supriya Sule Speech : लोकसभेत (Loksabha) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच 'एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत', असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणत केला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचं (Modi Government) मोठं अपयश असल्याची टीका करत सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत असल्याचं घणाघात देखील सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारवर केला आहे. लोकसभेत मंगळवार (8 ऑगस्ट) रोजी मणिपूरच्या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात अविश्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांनी मणिपूरसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
'वंदे भारतचं स्वागत पण...'
वंदे भारत सुरु केली हे चांगलच केलं पण त्यासोबत इतर रेल्वे का बंद केल्या असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे. माझ्या मतदारसंघातील तीन रेल्वे स्थानकांवर वंदे भारत थांबते पण त्या स्थानकांवरील इतर रेल्वे या रद्द करण्यात आल्या असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर वंदे भारत ही गरिबांसाठी नसल्याचं म्हणत वंदे भारत ही फक्त पाहता येते त्यामधून प्रवास करणं अशक्य आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आम्ही सातत्याने रेल्वेचे थांबे वाढवण्याची मागणी करत आहोत पण काही केल्या ती पूर्ण होत नाही, त्यामुळे त्या वंदे भारतचा काही उपयोग नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
जागतिक क्रमवारीत भारताची घसरण - सुप्रिया सुळे
मोदी सरकारनं म्हटलं होतं की चांगले दिवस येतील म्हटंल होतं पण अनेक गोष्टींमध्ये भारत हा खालच्या स्तरावर आला आहे, मग चांगले दिवस कसे आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत 288 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तेव्हा यांचा सबका साथ सबका विकास सबका प्रयास ही योजना कुठे गेली असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
'हे सरकार शेतकऱ्याचं नाही'
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत असल्याचा दावा देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदी सरकारनं दिलं होतं पण कोणत्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं हे सरकरानं आम्हाला सांगवं असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर दूध देखील मोदी सरकारमुळे महागलं असल्याची टीका त्यांनी केली आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे बरसल्या
मणिपूरच्या हिंसाचारावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. सध्याच्या मणिपूरच्या परिस्थितीमध्ये सरकार इतकं असंवेदनशील कसं काय वागू शकतं असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.