National Voters Day | मतदार म्हणून काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या मतदार दिनाचं महत्त्वं
देशभरात दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन अर्थात (national voters day) साजरा केला जातो. एक मतदार म्हणून नागरिकांना याबाबत जागरुक करणं हा त्यामागचा मुख्य हेतू असतो.
National Voters Day अर्थात राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी 25 जानेवारीला साजरा केला जातो. लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची संपूर्ण जगात ओळख आहे, अशा या राष्ट्रात मतदारांचं नेमकं महत्त्वं काय, त्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचं महत्त्वं काय आणि त्यांच्यामध्ये याबाबतची जागरुकता नेमकी कशा प्रकारे पसरवता येईल या उद्देशानं मतदार दिन साजरा केला जातो. जेणेकरुन मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करु शकतील.
2011 पासून या दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी 25 जानेवारीला हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवशी सहसा विविध राजकीय पक्ष आणि केंद्राकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत ओघाओघानं काही महत्त्वाच्या गोष्टींचा फायदाही नागरिकांना होतो. पण, अनेकांनाच याबाबची माहितीही नसते.
मतदानाचा अधिकार
भारतात 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही अधिकाराला धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव करत या अधिकारापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही.
उमेदवारांबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे. उमेदवाराची संपत्ती, गुन्हेगारी नोंद, शैक्षणिक पात्रता अशा संदर्भातील माहिती त्यांना मिळू शकते. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे, याबाबतचा निर्णय़ सर्वोच्च न्यायालयानंही स्पष्ट केला आहे.
नव्या ठिकाणी वास्तव्यास गेलं असता तेथे मतदानाचा अधिकार
ज्या ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचं नाव आहे, तिथंच त्यांनी मतदान करणं अपेक्षित असतं. वास्तव्याचं ठिकाण बदलल्यास अमुक एक मतदार नव्या मतदाराच्या रुपात सदर नव्या ठिकाणहून मतदान कार्ड बनवून घेऊ शकतो/ शकते. पण, तत्पूर्वी त्यांनी जुन्या मतदार यादीतून नाव हटवणं अपेक्षित असतं.
पोस्टाद्वारे मत नोंदवण्याचा अधिकार
मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी निवडणूक आयोगाकडून पोस्टल वोटींग अर्थात पोस्टाद्वारे मतदान करण्याची सोय करण्यात येते. यामध्ये निवडणूक प्रक्रियेती कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेच्या सेवेतील कर्मचारी यांचा समावेश असतो.