Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना ईडी विचारणार 36 प्रश्न, संध्याकाळपर्यंत चौकशी सुरू राहण्याची शक्यता
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची आज ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत त्यांना 36 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
Sonia Gandhi : नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज चौकशी होणार आहे. ही चौकशी आज संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. ईडीकडून (ED) आज सोनिया गांधी यांना जवळपास 36 प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी यांच्यासह चौकशी दरम्यान प्रियंका गांधी-वाड्रादेखील उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची याआधी मागील आठवड्यात गुरुवारी चौकशी करण्यात आली होती. जवळपास साडे तीन तासांच्या चौकशीनंतर सोनिया गांधी यांना घरी जाण्यास ईडीने परवानगी दिली. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी समन्स पाठवले. सोनिया गांधी यांचे प्रकृती पाहता ईडी अधिकारी सतर्क आहेत. चौकशी करणारे ईडी अधिकारी मास्क घालून त्यांची चौकशी करतील. त्याशिवाय ईडीने थेट 36 प्रश्नांची यादी तयार केली असून हे प्रश्न थेटपणे सोनिया गांधी यांना विचारण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. सोनिया गांधी यांच्यासह प्रियंका गांधीदेखील या चौकशीच्या वेळी हजर असतील. त्यांना सोनिया गांधी यांची औषधे जवळ ठेवण्यास ईडीने परवानगी दिली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांच्या अगोदर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली होती. राहुल गांधी यांची पाच दिवस 50 तास चौकशी केली होती. सोनिया गांधी यांचीही चौकशी त्या दरम्यान होणार होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी चौकशी पुढे ढकलण्याची विनंती ईडी अधिकाऱ्यांना केली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.
दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शनं केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.