नवी दिल्ली : एअर इंडियानं आपल्या वेबसाईटवर फ्लाईट बुकिंगबद्दलची माहिती टाकली आणि त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु करायची याबाबत केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाहीय, याबाबत काही घोषणा झाल्यानंतरच विमान कंपन्यांनी आपले बुकिंग सुरु करावेत, असं ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी केलं आहे.


कालच एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीने काही ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी 4 मे पासूनच्या प्रवासाचं तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी 1 जूननंतरच्या प्रवासाचं बुकिंग सुरु केल्याचं आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलं होतं. अर्थात वेळोवेळी स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असंही त्यात एअर इंडियानं म्हटलं होतं. एअर इंडिया वेबसाईटवरच्या या मेसेजनंतर विमानसेवा नेमकी कधी आणि कशा स्वरुपात सुरु होणार याविषयी चर्चा सुरु झाली.

हेही वाचा- कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम, प्रसिध्द आल्प्स पर्वतावर भारतीय तिरंगा

एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरील संदेश

खासगी विमान कंपन्याही मग बुकिंग सुरु करणार का असेही तर्क लावले जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे की, विमान कंपन्यांनी आपले बुकिंग्ज केंद्र सरकारच्या घोषणेनंतरच सुरु करावेत. विशेष म्हणजे या स्पष्टीकरणानंतरही एअर इंडिया वेबसाईटवर बुकिंगबद्दलचा तो मेसेज कायम आहे.

हेही वाचा - Coronavirus World Update | जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 31 हजारांवर तर मृतांचा आकडा 1 लाख 60 हजारांवर

आधीच्या मेसेजमध्ये आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी ठराविक हा शब्द लावण्यात आला नव्हता. नव्या मेसेजमध्ये 1 जून नंतरच्या प्रवासासाठी काही ठराविक आंतरराष्ट्रीय फ्लाईटचं बुकिंग सुरु असल्याचं सुधारित मेसेजमध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार विमानसेवेचं बुकिंग चालू करण्याबाबत अधिकृत घोषणा कधी करतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा - Lockdown | देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचं बुकिंग सुरू